नवी मुंबई : ठाण्यातील बेकायदा आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी समूह विकास योजनेची (क्लस्टर) वेगाने आखणी सुरू असतानाच नवी मुंबई महापालिका हद्दीत पहिल्या ‘क्लस्टर’ प्रकल्पांना परवानगी देण्याची प्रक्रिया महापालिका स्तरावर सुरू झाली आहे. नवी मुंबईत सिडकोने उभारलेल्या आणि अल्पावधीतच धोकादायक तसेच निकृष्ट ठरल्यामुळे चर्चेत राहिलेल्या जेएन-१-२ प्रकारच्या चार वसाहतींमधील रहिवाशांनी एकत्र येत समूह विकास योजनेच्या मंजुरीसाठी आग्रह धरला होता. या भागातील दोन नागरी पुनरुत्थान नकाशांना मंजुरी देण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली असून राज्य सरकारने यासंबंधीच्या प्रस्ताव मंजुरी दिल्यास हे दोन प्रकल्प शहरातील पहिले ‘क्लस्टर’ प्रकल्प म्हणून ओळखले जातील.
नवी मुंबईत सद्यस्थितीत सिडकोने उभारलेल्या अधिकृत इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर परवानग्या दिल्या जात आहेत. राज्य सरकारने डिसेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार (युडीसीपीआर) नागरी पुनरुत्थान योजनेसाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत. नवी मुंबईतील जुन्या तसेच मोडकळीस आलेल्या तसेच बेकायदा ठरलेल्या इमारतींनाही यामुळे समूह विकास योजनेत सहभागी होण्याचा मार्ग खुला करून देण्यात आला होता. सिडकोने उभारलेल्या तसेच ३० वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या इमारतींच्या पुनर्विकासात लगतच्या रस्त्यांचा आकार महत्त्वाचा ठरतो. यानुसारच या प्रकल्पांना किती प्रमाणात वाढीव चटईक्षेत्र दिले जाईल हे ठरत असते.
नवी मुंबईतील वाशी, कोपरखैरणे, नेरुळ यासारख्या उपनगरांमध्ये मोक्याच्या ठिकाणी आणि रुंद रस्त्यांलगत असलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी पुरेशा प्रमाणात चटईक्षेत्र मिळत असल्याने यापैकी बहुसंख्य वसाहतींनी यापूर्वीच पुनर्विकासाचा मार्ग धरला आहे. मात्र समूह पुनर्विकासाकडे अजूनही शहरात एकाही वसाहतीने मार्ग वळविला नव्हता. वाशी सेक्टर नऊ परिसरातील जे.एन १-२ प्रकारात मोडणाऱ्या वसाहतींमधील रहिवाशांनी एकत्र येत यासंबंधीचा एक प्रस्ताव विकासकामार्फत महापालिकेस सादर केला होता. या प्रस्तावातील नकाशे महापालिका प्रशासनाने जाहीर केले असून या प्रकल्पांना ‘क्लस्टर’मार्फत मंजुरी देण्यासंबंधी हरकती, सूचना मागविल्या आहेत.
क्लस्टरची गरज कशासाठी ?
वाशी सेक्टर ९ आणि १० परिसरात सिडकोने उभारलेल्या जे.एन.१-२ प्रकारच्या वसाहतींमधील घरे अल्पावधीतच निकृष्ट आणि धोकादायक ठरु लागली. या घरांच्या पुनर्विकासाचा मुद्दा मागील ३० वर्ष शहरात गाजत होता. राज्यात भाजप प्रणीत सरकार येताच नवी मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी वाढीव चटईक्षेत्राचा निर्णय जाहीर करण्यात आला. या वाढीव चटईक्षेत्राचा लाभ घेत मोठ्या प्रमाणावर पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू झाले आहेत. असे असले तरी वाशी सेक्टर ९, १० भागातील अंतर्गत भागात आणि निमुळत्या रस्त्यांलगत असलेल्या वसाहतींना पुनर्विकास करताना पुरेशा प्रमाणात चटईक्षेत्राचे फायदे मिळत नसल्याचे चित्र होते. वाढीव चटईक्षेत्र नसल्याने रहिवाशांना वाढीव आकाराची घरे आणि बिल्डरांना पुरेसा मोबदला मिळत नसल्याने काही वसाहतींचा पुनर्विकास ठप्प झाल्यासारखे चित्र होते. या भागातील नक्षत्र, जय महाराष्ट्र यासारख्या मोठया वसाहतींच्या पुनर्विकासालाही यामुळे मर्यादा येत होत्या. अखेर या भागातील चार वसाहतींनी एकत्र येत ‘क्लस्टर’चा पर्याय पुढे आणला होता. त्यानुसार महापालिकेने मेसर्स जॅप्स को.ॲापरेटिव्ह हौसिंग सोसायटी (१३ हजार ७३५ चौरस मीटर) आणि नक्षत्र अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन (११ हजार १६४ चौरस मीटर) हे दोन नागरी पुनरुत्थान नकाशांना तत्वत: मंजुरी दिली असून यासंबंधी हरकती, सूचना मागविण्यात आल्या आहेत. नवी मुंबईतील ‘क्लस्टर’चा हा पहिला प्रयोग आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे सहाय्यक संचालक नगररचना सोमनाथ केकाण यांनी लोकसत्ताला सांगितले. क्लस्टरच्या या प्रयोगामुळे या वसाहतींच्या पुर्नविकासाला चार इतका वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक मिळेल असेही केकाण यांनी स्पष्ट केले.
वाशीच नव्हे तर नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये दाटीवाटीने वसलेल्या वसाहतींमध्ये ‘क्लस्टर’ला परवानगी देण्यात यावी यासाठी आम्ही आग्रही होतो. खासदार नरेश म्हस्के यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा प्रश्न मांडला होता. नगरविकास विभागाने यासंबंधी महापालिका अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली होती. त्यानुसार नागरी पुनरुत्थान योजनेच्या माध्यमातून प्रस्तावांचा सकारात्मक पद्धतीने विचार करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले होते. वाशीतील क्लस्टरचा हा श्रीगणेशा संपूर्ण नवी मुंबईत मार्गदर्शक ठरेल हा विश्वास आहे. किशोर पाटकर, जिल्हाप्रमुख शिवसेना (शिंदे)
सिडकोने उभारलेल्या धोकायदाक इमारतींच्या पुनर्विकासासाठी यापुर्वी तीन इतका चटईक्षेत्र निर्देशांक मिळत दिला जात होता. नवी मुंबईत दाटीवाटीने तसेच निमुळत्या रस्त्यांना लागून असलेल्या वसाहतींचा पुनर्विकास मर्यादित स्वरुपात शक्य होत होता. त्यामुळे क्लस्टरसारखा पर्याय काही भागात आखला जावा अशी मागणी पुढे येत होती. यासंबंधी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होताच वाशीत क्लस्टरच्या दोन आराखड्यांची रचना करण्यात आली असून हरकती, सूचना मागविण्यात आल्या आहेत. सोमनाथ केकाण, सहाय्यक संचालक, नगररचना नमुमपा