रबाळेतील निब्बाण टेकडीवरील इमारतीची दुरवस्था
रबाळे येथील निब्बाण टेकडी परिसरात पालिकेचे एक ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात तीन हजार ५६७ पुस्तके आहेत. ग्रंथालय इमारतीत बाल वाचनालय, मासिके, ‘सक्र्युलेटिंग लायब्ररी’ आणि एक अभ्यासिका आहे. गेली पाच वर्षे ग्रंथालयाची इमारत या ठिकाणी उभी आहे; परंतु एवढय़ा प्रदीर्घ कालावधीनंतरही या ग्रंथालयातील सभासद संख्या आजवर आठच राहिली आहे. पालिका विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांचा लाभ व्हावा. त्यांच्या अभ्यासाची सोय व्हावी, यासाठी ग्रंथालय सुरू करण्यात आले. मध्यंतरी जीर्ण अवस्थेस पोहोचलेल्या ग्रंथालयाला उभारी देण्यासाठी रबाळे येथील पालिकेच्याच शाळेत हलविण्याचा प्रस्ताव असतानाही काही नेत्यांच्या असहकार्यामुळे ते त्याच इमारतीत कायम ठेवावे लागल्याने विद्यार्थ्यांच्या वाचनसंस्काराचे रबाळेवासीयांचे स्वप्न अपुरेच राहिले आहे.
‘वाचाल तर वाचाल’ या वाक्यातून वाचन महत्त्व नेहमीच पटवून दिले जाते; परंतु रबाळेतील पालिकेच्या ग्रंथालयात वाचण्यासाठी गेलेल्या वाचक वा विद्यार्थ्यांला सध्या धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतीत जीव वाचवायचा असेल तर तेथून बाहेर पड, असा सल्ला दिला जात असल्याचे येथील काही जागरूक नागरिकांनी सांगितले.
निब्बाण टेकडी परिसरातील हे एकमेव ग्रंथालय आहे. ग्रंथालयाच्या इमारतीचे प्रवेशद्वार तुटले आहे. हे पालिकेचे ग्रंथालय असले तरी त्याबाबतची कोणतीही ओळख प्रशासनाने ठेवलेली नाही. प्रवेशद्वारावरील पालिका ग्रंथालय या नावाची पाटीही गंजून गळून पडली आहे. याला कित्येक वर्षे लोटली आहेत. त्यामुळे या ठिकाणी ग्रंथालय असल्याची कोणत्याही खुणा नागरिकांना दिसत नाहीत. ग्रंथालयाच्या प्रवेशद्वारावर सध्या भटक्या कुत्र्या-मांजरांचा पहारा असतो. त्यांच्या दहशतीमुळे नागरिकांनी अनेकदा येथे येणं टाळतात, असे वाचक ज्ञानोबा सोनावणे यांनी सांगितले.
पावसाळ्यात तर ग्रंथालयात कोणी येत नाही. गळक्या छतातून सर्वत्र पाणी साचते. छताचे प्लास्टर जागोजागी पडलेले आहे. भिंतीला तडे गेले आहेत. त्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. याशिवाय येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे त्यांना नजीकच्या नागरी आरोग्य केंद्रातून पाणी आणावे लागते. इमारतीला लागून असलेल्या शौचालयात पाण्याची सोय नसल्याने त्याचा वापर बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या तेथे तुटलेले साहित्य ठेवले जाते. त्यामुळे वाचक आणि कर्मचाऱ्यांची शौचालयाअभावी मोठी गैरसोय होत आहे.
इमारतीत किमान वीज दिव्यांची सोय व्हावी यासाठी पालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे; परंतु त्याची दखल घेण्यात आली नसल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.
ग्रंथालय इमारतीसमोर कचराकुंडी असल्याने या भागात दरुगधी पसरलेली असते. इमारतीतील समस्या गेल्या पाच ते सहा वर्षांपासून कायम आहेत. हे ग्रंथालय झोपडपट्टी परिसरात येत असल्याने पालिका अधिकारी त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप वाचकांनी केला आहे.
इमारतीच्या अवस्थेबाबत माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही. ग्रंथालयाच्या समस्येबाबत कोणत्या कर्मचाऱ्याने पाठपुरावा केला त्यांची नावे द्या. ग्रंथालयाची पाहणी करून पुढील उपाययोजना करण्यात येतील आणि स्थिती सुधारली जाईल.
– तृप्ती सांडभोर, समाज विकास विभाग उपायुक्त.