प्रकाश कन्स्ट्रक्शनच्या राजेश नाईक यांचा आरोप

नवी मुंबई पोलीस दलातील काही अधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांना हाताशी धरून ‘स्वराज बिल्डर’चे मालक राज खंदारी यांनी ७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ‘प्रकाश कन्स्ट्रक्शन’चे मालक राजेश नाईक आणि त्यांचे सहकारी प्रकाश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत केला.

पनवेल तालुक्यातील उलवा नोडमधील सेक्टर १८ प्लॉट क्रमांक ४७ येथे खंदारी यांच्या मालकीच्या स्वराज बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्या माध्यामातून स्वराज किंगस्टन या इमारत उभारणीचे काम २०११पासून सुरू होते. इमारतीसाठी आवश्यक खडी, विटा, रेती, पाणी आणि संबंधित यंत्रसामुगी पुरवठा करण्याचे काम राजेश नाईक यांनी स्वत:च्या मालकीच्या ‘प्रकाश कन्स्ट्रक्शन’च्या मार्फत केले; परंतु खंदारी यांनी पुरविलेल्या साहित्याच्या बिलापैकी ७५ लाखांचे बिल देण्यास टाळाटाळ सुरू केली.त्यामुळे नाईक याविरोधात तक्रार दाखल करण्यास पोलीस ठाण्यात गेले; मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. यात खंदारी यांना शिवसेनेच्या काही नेत्यांनी मदत केल्याचा आरोप राजेश नाईक आणि प्रकाश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.