‘एमआयडीसी’ जलवाहिनीला गळती; मोरबे धरणातून पाण्याची मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठय़ामुळे गेली अनेक वर्षे संतप्त असलेले दिघावासीय आता अशुद्ध पाण्यामुळे आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी पाण्यात आळ्या सापडल्यानंतर त्यावर कोणतेही उपाय होत नसताना आता कित्येक महिने टाकी  साफ न केल्याने लालरंगाचे पाणी येते आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने मोरबेतून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.

त्यात दिघा, तुर्भे, नेरुळ भागातील जलवाहिनीला गळती लागली असून त्यामुळे परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवासी मेटाकुटीस आले आहेत.

दिघा पालिकेत असूनही एमआयडीसीतर्फे पाणीपुरवठा केला जात आहे.  एमआयडीसीची या विभागातील जलवाहिनी बरीच जुनी आहे. १९६० मध्ये ही वाहिनी टाकण्यात आली. पाच दशकांहून अधिक काळ झाल्याने ही वाहिनी जीर्ण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी गळते. परिणामी लाखो लिटर्स पाणी वाया जाते. या वाहिनीतून एमआयडीसी विभाग, दिघा तसेच काही झोपडपट्टय़ांना पाणीपुरवठा केला जातो.

दिघ्याला एमआयडीसीकडून दररोज १२ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जात आहे. प्रत्यक्षात या उपनगराला दररोज १८ दशलक्ष लिटर्स पाण्याची आवश्यकता आहे. म्हणजे मुळात होणारा पाणीपुरवठा अपुरा आहे. त्यात गळतीमुळे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सध्या दर शुक्रवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद असतो. त्यानंतर शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. या काळात रहिवाशांचे खूप हाल होतात. काही घरांमध्ये शनिवारीही पाणी येत नाही. त्यामुळे मोर्बे धरणातून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी रहिवासी करीत आहेत.

दिघा विभागात एमआयडीसीकडून पालिकेच्या टाकीत पाणी साठवून नंतर वितरित केले जाते. ती टाकीही कित्येक महिने साफ केलेली नाही.  त्यामुळे त्यात लाल मातीचा थर बसला आहे. परिणामी त्यातून लालरंगाचे पाणी येते. पालिकेने ही बाब गंभीरपणे घेऊन त्याची शहानिशा करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

एमआयडीसीच्या वाहिनीला ज्या ठिकाणी गळती होते, त्याची तातडीने दुरुस्ती केली जाते. दर आठवडय़ाला ही कामे सुरू असतात, असे एमआयडीसीचे  उपअभियंता  यशवंत मिश्राम यांनी सांगितले.

लवकरच मोरबेतून दिघ्याला पाणीपुरवठा करणार आहे. त्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. येत्या सहा ते सात महिन्यांत दिघ्याला पालिकेकडून पाणी पुरवठा केला जाईल. पाण्यात आळ्या सापडल्यानंतर त्याचे नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत.

– सुरेंद्र पाटील, शहर अभियंता.

अहवाल अद्याप गुलदस्त्यातच

दिघा विभागातील आंबेडकरनगर, गणेशनगर, मोनालिसा इमारतीतील रहिवाशांना पाण्यात आळ्या सापडल्या. याबाबत स्थायी समितीत स्थानिक नगरसेवक नवीन गवते यांनी आवाज उठवून पालिकेचे लक्ष वेधले होते. त्यावर प्रशासनाने पाण्याची तपासणी करून नमुने घेतले जातील, असे सांगितले होते. मात्र तपासणी अहवाल अद्याप गुलदस्त्यातच आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Red water for digha resident
First published on: 07-12-2018 at 01:21 IST