उरण : फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) चिरनेर या निसर्गप्रेमी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी धुळवडीनिमित्ताने जंगलात जाऊन तेथील वन्यजीव आणि प्राण्यांसाठी मृत झालेले पाणीसाठे पुन्हा जिवंत केले आहेत. त्यामुळे रखरखत्या उन्हाळ्यात या वन्यजीवांना प्यायला घोटभर पाणी मिळणार आहे. उरणमधील जंगल परिसरातील वन्यजीव अधिवासातील पाण्याच्या मृत पावलेल्या झऱ्यांना नवसंजीवनी देण्याचे कार्य यामुळे झाले आहे.
चिरनेर बापदेव परिसरातील पेरीचे पाणी या पाणवठ्यावर धुळवडीच्या दिवशी श्रमदान करून तिथे झऱ्यास पुनर्जीवित केले. या वेळी पाणवठ्यावर पाणी कमीच लागले. परिसरातील अनेक ठिकाणी पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे या वर्षी वन्यजीव आणि जंगलातील प्राण्यांना उन्हाळ्यात पाण्याचे भयंकर दुर्भिक्ष असेल. चिरनेर बापदेव परिसरातील पेरीचे पाणी या पाणवठ्याचा अनेक वर्षांपूर्वी तिथे असणाऱ्या आदिवासी कातकरी समाजाच्या वस्तीकडून पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होत होता. पण आता त्या पाणवठ्याचे पाणी तेथील आदिवासी बांधव वापरत नसल्यामुळे हा पाणवठा गाळाने बुजला गेला होता.
उरणमध्ये डोंगर उघडे-बोडके करून त्यांचे सपाटीकरण करून निसर्गाची जी अपरिमित हानी केली जातेय, त्याची झळ मानवाबरोबर वन्यजीवांनाही भोगावी लागतेय. उरणचा हवेचा दर्जा खालावत असल्याबाबत पर्यावरणवादी आवाज उठवत आहेत.
उरणमध्ये निसर्गाची हानी
- मागील तीन वर्षे संस्थेने त्यातील गाळ काढून वन्यजीवांच्या पाण्याची व्यवस्था केली.
- अनेक दुर्मीळ वन्यजीवांचा वावर व अस्तित्व अजूनही टिकून आहे व त्यात अनेक जीव असे आहेत ज्यांचे अस्तित्वच देशाच्या इतर भागांतून नष्ट होत चालले आहे.
- उरणमध्ये विकासाच्या नावाखाली निसर्गाची जी भयानक कत्तल होतेय, वणवे लावून सर्व वनसंपदा नष्ट करीत आहेत.