तळोजा औद्योगिक वसाहतीमधून बेलापूर स्थानकात जाणारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाची (एनएमएमटी) बससेवा मागील आठवडय़ात सुरू झाली. परंतु या बससेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने ही बससेवा रोडपाली नोडच्या परिसरातून चालविण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. यासाठी रोडपाली येथील रहिवाशांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. मागील आठवडय़ात माजी खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले होते.
तब्बल २५ वर्षांनंतर तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावरून प्रवाशांना थेट बेलापूर रेल्वेस्थानकापर्यंत पोहोचवणारी एनएमएमटीची ७१ क्रमांकाची बससेवा गाजावाजात सुरू झाली असली तरीही या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा हवा तसा लाभ प्रवाशांना होत नाही. नावडे व रोडपाली नोडमध्ये प्रवाशांना सकाळी व सायंकाळच्या सुमारास १० ते १५ मिनिटांच्या अंतरावर या पल्यावर बससेवा असल्यास ते या बससेवेचा हिस्सा होऊ शकतील. उद्घाटनाच्या समारंभात एनएमएमटीचे सभापती साबू डॅनियल यांनी ‘हात दाखवा तिथे बस थांबवू’ असे आवाहन प्रवाशांना केले. याच समारंभात रोडपाली सिटीझन फोरमच्या सदस्यांनी ७१ क्रमांकाची बससेवा रोडपाली पोलीस मुख्यालयाच्या चौकातील रस्त्यावर काढल्यास या परिसरातील प्रवाशांच्या फायद्याची ही बस होईल, अशी मागणी केली होती. परंतु आठवडा उलटला तरीही रोडपालीच्या रहिवाशांच्या मागणीवर एनएमएमटी प्रशासनाने विचार केलेला नाही.
फोरमच्या माध्यमातून सेक्टर १४ ते २० मधील सुमारे ५० सोसायटय़ांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी एनएमएमटीला आश्वासनांचे स्मरण करून देण्यासाठी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. दररोज बेलापूर ते तळोजा एमआयडीसी या मार्गावर ७१ क्रमांकाच्या ५ बस धावतात. यामधून एनएमएमटीला दिवसाला साडेपाच हजार प्रवासी मिळणे अपेक्षित होते. मात्र सध्या दीड हजार प्रवासी कसेबसे या ७१ क्रमांकाच्या बसमधून प्रवास करतात. ही बस २३ मिनिटांनी असल्याने बेलापूर रेल्वेस्थानकात जाणारे प्रवासीवगळता इतर प्रवासी सहा आसनी रिक्षातून जाणे पसंत करतात. ही बस रोडपाली डीमार्ट समोरून पुन्हा रोडपाली पोलीस मुख्यालयाच्या मार्गे बेलापूर स्थानकाकडील मार्गावर वळविल्यास प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळेल.