नवी मुंबई : मनसे प्रवक्ते तथा शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या आर्थिक हितसंबंधांमुळे काम करण्यास अडचणी येत असल्याने उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे यांनी पदाचा राजीनामा दिला दिला आहे. याबाबत आजच्या (शनिवार) पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे.
नवी मुंबईतील उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे यांनी स्थानिक नेतृत्व काम करू देत नसल्याची खंत या वेळी व्यक्त केली. आजारी असताना माझ्या भागातील पदांचे वाटप मला विश्वासात न घेता परस्पर करण्यात आले. या शिवाय कार्यकर्त्यांत भांडणे लावणे, धमक्या देणे असल्या प्रकाराने शिस्त बिघडली. त्यात गजानन काळे यांचे महापालिकेत आर्थिक हितसंबंध असल्याने अधिकारी आमच्या पत्रांना उत्तर देत नाही, असा आरोप घोरपडे यांनी केला. गजानन काळे यांनी आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना घेऊन माझ्या कार्यालयात येऊन धमकी दिल्याचा दावा त्यांनी केला. याबाबत अनेकदा वरिष्ठांच्या कानावर घातले, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही, असे ते म्हणाले.
जबाबदारीच्या पदावर आलो तेव्हा वाटले मोठी जबाबदारी आली. आता राजकारणात तुमच्या मार्फत जनतेसाठी खूप काही करणार हे मनात पक्के केले होते. पण आता ते एका स्वप्नाप्रमाणे राहूनच गेले साहेब, याची उणीव नेहमी माझ्या मनात असेल, अशी भावना राजीनाम्यात व्यक्त करीत पदत्याग केल्याचे घोरपडे यांनी सांगितले.