सिडकोतील बैठकीनंतर अजित पवारांचे स्पष्टीकरण

नवी मुंबई : नवी मुंबईतील सिडको, पालिका, एपीएमसी आणि एमआयडीसी या स्थानिक प्राधिकरणांचा आता दर पंधरा दिवसाला आढावा घेतला जाणार असून नागरी प्रश्नांना न्याय देण्यासाठी नवी मुंबईत मुक्काम ठोकणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सिडकोत घेतलेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जाहीर केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी बेलापूर येथील सिडको मुख्यालयात अधिकारी व राष्ट्रवादीच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांसह एक आढावा बैठक घेतली.  या वेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी पवार यांच्या अनेक प्रश्नांना व समस्यांना सिडकोच्या वतीने उत्तरे दिली. उरण, पनवेल भागांत रखडलेली साडेबारा टक्के योजना पूर्ण करण्यात यावी अशी सूचना अजितदादा यांनी दिल्या. या वेळी प्रकल्पग्रस्तांची घरे कायम करण्यासंदर्भात, पुनर्विकास, भूखंड हस्तांतरण या प्रश्नांवर त्यांनी सिडकोला काही निर्देश दिले.

सिडको सर्व रेल्वे स्थानके, बस आगार व टर्मिनल्स यांच्याजवळ परिवहन आधारित गृहनिर्माण योजना आखत आहे. या प्रकल्पाला अनेक सामाजिक संस्था, पक्ष, संघटना व ऐरोलीचे आमदार  गणेश नाईक यांनी विरोध केला आहे. यावर अजित पवार यांनी हा प्रकल्प भविष्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पूर्ण करावा आशा सूचना या वेळी सिडकोला दिल्या.

नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका पुढील वर्षी होण्याची शक्यता आहे. करोनाची तिसरी लाट येण्याच्या भीतीने या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. राष्ट्रवादीच्या हातून गेलेली सत्ता कायम ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार हे पुढे सरसावले असून नवी मुंबईत पुढील काळ मुक्काम ठोकणार असल्याचे संकेत दिले आहेत.

आघाडीतील इतर पक्षांतील नेत्यांची अनुपस्थिती

अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी ही बैठक त्याच पदाचा आधार घेऊन लावलेली होती. मात्र या बैठकीला राष्ट्रवादीचे स्थानिक नेते वगळता महाविकास आघाडीतील एकाही नेत्याची या बैठकीला उपस्थिती नव्हती. स्थानिक पातळीवरील केवळ आमदार शशिकांत शिंदे होते. त्यामुळे या बैठकीवर इतर पक्षांनी नाराजी व्यक्त केली असून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या महामंडळात राष्ट्रवादीचा शिरकाव पटलेला नाही.