उरण : करळ वरून जेएनपीए(तत्कालीन न्हावा शेवा) बंदरला जोडणाऱ्या प्रवासी मार्गावर करळ उड्डाणपूला खालील मार्गाला प्रचंड खड्डे पडले असून मार्गाची अक्षरशः चालन झाली आहे. त्यामुळे या मार्गाने एस टी, एनएमएमटी तसेच रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवासी आणि वाहनचकांनी त्रस्त होत संताप व्यक्त केला आहे. या मार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
जेएनपीए बंदराच्या उभारणीसाठी उरण पनवेल मार्गाला जोडून करळ मार्गे जाणाऱ्या मार्गाची उभारणी करण्यात आली आहे.१९८७ च्या काळात जपानच्या कंपनीच्या माध्यमातून हा पहिला मार्ग तयार करण्यात आला होता. त्यावेळी जेएनपीए बंदरातून साधारणतः वर्षाला एक लाख कंटेनरची हाताळणी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार या मार्गाची मजबुतीने उभारणी करण्यात आली होती. सुरुवातीला याच एकमवे मार्गाने बंदरात दररोज हजारो ये जा करणारी जड कंटेनर वाहने प्रवास करीत होती. मात्र मार्ग भक्कम असल्याने खड्डेमुक्त मार्ग होता.
याचे मुख्य कारण म्हणजे या मार्गावरील पाणी निचरा याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र काही वर्षानी या मार्गाकडे दुर्लक्ष होत गेले. तर २०१८ मध्ये बंदराला जोडणारे दोन राष्ट्रीय महामार्ग उभारण्यात आले आहेत. या मार्गाकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचू लागले आहे. परिणामी मोठमोठे खड्डे पडत असून त्यांची संख्या वाढू लागली आहे. हा मार्ग उरण मधील एस टी आणि एन एम एम टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासाचा हा मुख्य मार्ग आहे.
मात्र खड्ड्यामुळे येथील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जेएनपीए ने या मार्गाची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी येथील प्रवासी आणि नागरिकांकडून केली जात आहे. एकीकडे या मार्गावर खड्डे पडलेले असतांना दुसरीकडे याच मार्गाच्या दोन्ही बाजूने शेकडो कंटेनर वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे या मार्गाने दररोज प्रवास करणाऱ्या वाहनांवर याचा परिणाम होत असून या मार्गावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.