नेरुळ येथील सराफाकडील कामगारांकडून फेब्रुवारी महिन्यात ४५ लाख रुपये किमतीचे दागिने असलेली पिशवी बस प्रवासादरम्यान चोरीला गेली होती. पोलिसांनी त्याच बसमध्ये घेतलेल्या झडतीनंतर एका अनोळखी पिशवीमधील साहित्य आणि एका लहानशा वाटीवरील एका नावामुळे ही चोरी उघडकीस आली असून याप्रकरणी नेरुळ पोलिसांनी एका संशयित चोरासह सुमारे १८ लाख रुपये किमतीचे सोने व लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.
नेरुळ येथील महेशकुमार बाफना यांच्या मालकीचे हे सोने होते. बाफना हे नांदेड येथे सोन्याचे दागिने तयार करून देण्याचे काम करतात. बाफना यांचे सोन्यांच्या दागिन्यांची ने-आण करण्याचे काम वृषभ व जीवन हे दोन कामगार करत असतात. २१ फेब्रुवारीला नांदेडवरून नेरुळला शर्मा ट्रॅव्हल्स बसमधून हे दोघे परतत असताना त्यांच्याजवळील पिशवी चोरीला गेली. याबाबत नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या बसची झडती घेतल्यावर त्यांना बसचालकाजवळ बसलेल्या एका अनोळखी प्रवाशाची बेवारस पिशवी सापडली. या पिशवीमध्ये कटर, चादर, टॉवेल व लहानगी स्टीलची वाटी सापडली. या वाटीवर राजाराम सखाराम डिकोळे हे नाव कोरले होते. राजाराम डिकोळे या नावावरून पोलिसांच्या तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी पिशवीतील वाटीच्या नावासोबत वृषभ व जीवन यांनी नांदेड येथील ज्या दुकानांना भेटी दिल्या तेथील सीसीटीव्हीचे चित्रीकरण मिळवले. या चित्रीकरणामध्ये वृषभ व जीवन यांच्यावर काही व्यक्ती पाळत ठेवत असल्याचे पोलिसांच्या ध्यानात आले, मात्र पिशवीतील वाटीने डिकोळे यांच्या नावाने पोलिसांच्या तपासाला योग्य दिशा दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ांमधील मतदार यादींच्या नावातून डिकोळे हे नाव शोधल्यावर पोलिसांचा तपास सोलापूर जिल्ह्य़ातील माढा तालुक्यातील घाटणे गावाकडे केंद्रित झाला. राजाराम डिकोळे यांच्यापर्यंत नेरुळ पोलीस पोहोचल्यावर त्यांच्या माहितीवरून भारत शंकर डिकोळे या संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. भारत हा गावात कापडाचा व्यवसाय करतो. पोलिसांनी भारतला ताब्यात घेतल्यावर संपूर्ण चोरीला कसा सापळा रचला हे उजेडात आले. भारतजवळून १८ लाख रुपये किमतीचे साने व एक लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच चोरीनंतर इतर सोने इतर चोरांनी वाटून घेतल्याचे पोलिसांना भारतने सांगितले. भारतला पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. तसेच या प्रकरणातील भारतचे इतर चार साथीदार व २८ लाख रुपये किमतीचे सोने व रोकड यांचा पोलीस शोध घेत आहेत. या चोरीमध्ये भारतचे सहकारी सर्जेराव डिकोळे, अनिल डिकोळे, विनायक गुंजाळ, लहू दगडे यांचा पोलीस शोध घेत आहेत. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी नेरुळ पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.