समुद्र उधाणापासून संरक्षणासाठीचे बांध कमकुवत
उरणमधील शेतकऱ्यांनी चिखलातून ६ हजार १८० हेक्टरवर भात पिकवला. त्याचे समुद्राच्या महाकाय उधाणापासून संरक्षण करण्यासाठी मोठमोठे बांध बांधले, मात्र ते कमकुवत झाल्याने समुद्राच्या मोठय़ा भरतीच्या वेळी बांधारे फुटून समुद्राचे खारेपाणी भातशेतीत शिरत आहे. त्यामुळे शेकडो एकर जमीन नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुढील आठ महिन्यांत भरतीचे पाणी शेतात आणि उरणमधील गावांतही शिरण्याची शक्यता आहे.
[jwplayer CdTbNsE8]
राज्यात अनेक ठिकाणी नापिकीमुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. उरणमधील शेतकरी संकटांवर मात करीत शेती करीत आहेत. मात्र शासनाच्या खारलँड विभागाकडून मंजूर झालेल्या कामाचा निधी वेळेत उपलब्ध होत नाही. त्यामुळे उरणमधील हजारो हेक्टर जमिनीत समुद्राचे पाणी जाऊन ती नापीक होण्याची वेळ आली आहे.
एकदा भातशेतीत पाणी शिरले की पुढील किमान तीन ते चार वर्षे शेतकऱ्याला या शेतीत पीक घेता येत नाही, असे तेथील शेतकरी सोमनाथ ठाकूर यांनी सांगितले. शेती पूर्ववत करण्यासाठी अपार मेहनत करावी लागते. मजुरीच्या वाढलेल्या दरामुळे मजूरही परवडत नाहीत. अशा अवस्थेत शेतकरी सापडला आहे.
भरतीच्या पाण्यामुळे केवळ शेतीच नाही, तर सिडकोने विकसित केलेल्या उरणच्या द्रोणागिरी नोडमधील गावांतही भरतीचे पाणी जाण्यासाठी असलेल्या नैसर्गिक वाटा बंद झाल्याने धोका निर्माण झाला आहे. गेल्यावर्षीही शेतकऱ्याच्या हाती आलेले भाताचे पीक समुद्राच्या पाण्यामुळे वाया गेले होते.
आश्वासन हवेत
२०१५ मध्ये रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी भाता नुकसानीची पाहणी करून खारबंदिस्तीसाठी शासनाचा निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केलेले होते. मात्र वर्षभरानंतर पुन्हा एकदा मोठीजुई येथील शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
खाडीकिनाऱ्यावरील बांध फुटल्याने होणाऱ्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खारलँड कृषी विभागाकडून संयुक्त पाहणी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जाणार आहे.
– कल्पना गोडे, तहसीलदार, उरण
[jwplayer y8Pn2zMM]