नवी मुंबई : सदनिका अंतर्गत अनधिकृत पणे काम केल्याच्या तक्रार प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सदनिका सील करण्यात येत आहे. अशी धमकी देत दोन जणांनी एक लाख रुपये संबंधित सदनिका धारकां कडून घेतले आहे. संशयित आरोपीनी स्वतः मनपा कर्मचारी असल्याचे भासवले होते. या प्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील फिर्यादी आंनद साटम हे सानपाडा येथील मोराज रेसिडेन्सी येथे राहतात. त्यांची एक सदनिका सानपाडा सेक्टर १८ क्वीन हेरिटेज येथे आहे. ८ तारखेला याच ठिकाणी मनपा अतिक्रमण विरोधी कक्षचे अधिकारी असल्याचे सांगत एक व्यक्तीं आली. त्यांनी स्वतःचे नाव तायडे असे सांगितले. काही वेळाने त्यांच्या मागोमाग अन्य एक व्यक्तीं आला ज्याने स्वतःची ओळख साहेबांचा वाहन चालक म्हणून सांगितली.

कथित तायडे नावाच्या व्यक्तीने या सदनिकेत नूतनिकरण करण्यात आले असून ते बेकायदा आहे. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगितले. अशा प्रकारे काम करणे बेकायदेशीर असल्याने ही सदनिका सील करण्यात येत असल्याची धमकी दिली. यातील फिर्यादी यांनी सील न करण्याची विनंती केल्यावर एक लाख रुपयांची मागणी कारण्यात आली.

मात्र एवढे पैसे रोख नसल्याचे सांगितल्यावर संशयित आरोपीने ऑनलाईन द्या असे सांगत हे केले नाही तर सदनिका सील होईल अशी धमकी दिली. नाईलाजाने फिर्यादी यांनी एक लाख रुपयांची रक्कम संशयित आरोपी याने दाखवलेल्या क्यू आर कोडं द्वारे ऑनलाईन पाठवले. फिर्यादी यांनी घडलेल्या प्रकारा संबंधी अधिक माहिती घेतली असता मनपा अधिकारी म्हणून आलेले लोक हे मनपा कर्मचारी नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांनी आपली फसवणूक झाली अशी तक्रार सानपाडा पोलिसांना दिली. या तक्रारीची दखल घेत सानपाडा पोलिसांनी संशयित आरोपी तावडे आणि त्याचा वाहन चालक यांच्या विरोधात सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून आर्थिक फसवणूक केली. म्हणून मंगळवारी गुन्हा नोंद केला आहे.