पनवेल – पनवेल तालुक्यातील चिखले गावातील गायरान जमीन प्रकरणात दीर्घ काळ न्याय न मिळाल्याने गावच्या सरपंच दिपाली तांडेल व त्यांचे पती दत्तात्रय यांनी मंगळवारी राहत्या घरात आत्महत्येचा प्रयत्न केला. सरकारी अधिकारी व पोलिसांनी सरपंच व त्यांच्या पतींना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या या संवादाला यश आले नाही. अखेर सरपंचांनी घराबाहेर पोलीस बंदोबस्त असतानाच स्वताला कोंडून घेत विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सध्या तांडेल दाम्पत्यावर पनवेल शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

१७ मार्च रोजी सरपंच तांडेल व त्यांच्या पतींनी उपोषण सुरू केले होते. सलग १२ दिवस उपोषण केल्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांनी ८ दिवसांत बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजतागायत ना बैठक झाली, ना निर्णय झाला. सरपंच दिपाली व त्यांच्या पतीने सांगितले की, न्याय मिळत नसल्याने आम्ही हे पाऊल उचलत आहोत. 

ग्रामपंचायतीच्या नावावर असलेल्या गायरान जमिनीचा साठे करार करून तो करार रजिस्टर नोंदणी केला गेला. तसेच त्याच जमिनीवर मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करण्यात आली. गेल्या पाच महिन्यांपासून पाठपुरावा करूनही पोलीस व महसूल विभाग माती चोरांना पकडू शकले नाही आणि बेकायदा पद्धतीने जमिनीचे साठेकरार करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करु शकले नाही त्यामुळे सरपंच तांडेल व त्यांच्या पतीने संतापाने हे पाऊल उचलल्याचे मंगळवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. 

या गैरव्यवहारामध्ये याच गावचे तत्कालीन सरपंच तसेच ग्रामसेवकांचा सुद्धा हात असल्याचा आरोप तांडेल यांनी केलेल्या अर्जात केला आहे. या जमिनीचा लाभ घेणारे मोकाट सुटू नये म्हणून त्यांच्यावर चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी माफक मागणी तांडेल दाम्पत्यांची होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने तांडेल दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलले.  

संबंधित प्रकरण हे महसूल विभागाच्या अखत्यारीत येत असून २०१९ साली या गायरान जमिनीचा साठेकरार रजिस्टर झाला आहे. ज्या व्यक्तीने हा साठेकरार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे. साठेकराराच्या आधारे गाव महसूली दफ्तरी कोणताही फेरफार झालेला नाही. तसेच सातबाऱ्यावरसुद्धा कोणतीही नोंद झालेली नाही. ही दिवाणी प्रक्रिया असल्याने मी ग्रामपंचायतीला पत्र देऊन ग्रामपंचायतीने दिवाणी न्यायालयात संबंधित साठेकरार रद्द करण्याची प्रक्रिया करावी अशी सूचना दिली आहे. या दरम्यान संबंधित जमिनीच्या मातीचे उत्खनन झाल्याप्रकरणी महसूल विभागाने संबंधितांवर कारवाई करावी अशी सूचना केली आहे. त्यामुळे या बाबींवर तांडेल कुटुंबियांनी देहत्याग करू नये, अशीदेखील विनंती त्यांना आम्ही केली होती. – समीर वाठारकर, गटविकास अधिकारी, पनवेल</p>