महिनाभरात पुरवठा; स्थायी समितीची १० कोटींच्या खरेदीला मंजुरी
नवी मुंबई पालिकेच्या सर्व रुग्णालयांत रुग्णांना मोफत औषधे देण्याची तरतूद असताना वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयातील रुग्णांना औषधे बाहेरून विकत घ्यावी लागत आहेत. गेली अनेक महिने पालिकांच्या रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याने गरीब गरजू रुग्णांना विनाकारण आर्थिक भरुदड सोसावा लागत आहे. गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत तातडीचा प्रस्ताव ठेवून १० कोटींच्या औषध, उपकरणे खरेदीस मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता औषधांचा तुटवडा कमी होऊन रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे.
नवी मुंबई पालिकेची आरोग्य सेवा तीन स्तरांवर आहे. त्यामुळे प्रत्येक विभागात नागरी आरोग्य केंद्र आणि जवळपास माता बालसंगोपन केंद्र आहेत. वाशी सेक्टर-९ येथे एक मध्यवर्ती सार्वजनिक रुग्णालय असून या ठिकाणी दररोज दोन हजार बाह्य़ रुग्ण उपचारासाठी येत असतात. याशिवाय तीनशेच्या वर रुग्ण कायमस्वरूपी उपचारासाठी दाखल होतात. ऐरोली आणि नेरुळ येथील १०० खाटांची रुग्णालये बांधून तयार आहेत पण कर्मचारी व डॉक्टराअभावी ती पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाहीत. त्यामुळे पालिकेच्या वाशी येथील रुग्णालयावर मोठय़ा प्रमाणात ताण येतो.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून ही आरोग्यसेवा कोलमडली आहे. एका रुग्णाच्या मृत्यूनंतर दोन डॉक्टरांवर थेट कारवाई केल्यामुळे डॉक्टरांनी आंदोलन केल्याने व त्यात औषधांचा तुटवडा व उपकरणांची कमतरता या पेचात गेली काही महिने आरोग्यसेवा विस्कळीत झाली आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे औषधे खरेदी न करता आल्यामुळे औषधांचा मोठा तुटवडा होता. पालिका रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या रुग्णांना तेथील डॉक्टर बाहेरून औषधे खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे रुग्णांना हा आर्थिक भरुदड सोसावा लागत आहे.
पालिका आयुक्तांनी तातडीने आरोग्यसेवेतील कमतरता दूर करण्यात येईल व रुग्णालयीन साहित्य खरेदी करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत ऐन वेळी सुमारे स्थायी समितीत आरोग्यसुविधा सुरळीत करण्यासाठी तसेच मोठय़ा प्रमाणात भासणाऱ्या औषधांची कमतरता कमी करण्यासाठी आयुक्तांनी दहा कोटीपर्यंतचा औषध खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडला होता. तातडीच्या विषयांमध्ये आरोग्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. ९ कोटी ३४ लाख ८४ हजार २८७ रुपयांचे शस्त्रक्रिया, पॅथॉलॉजी साहित्य तसेच औषधे खरेदी करण्यात येणार आहेत. पुढील महिनाभरात खरेदी होणार आहे.
ऐन वेळी प्रस्ताव आल्याने नाराजी
रुग्णालयीन साहित्य, औषध खरेदीचे प्रस्ताव ऐन वेळी पटलावर घेतल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थायी समितीत सुरुवातीच्या १ ते १७ विषयांमध्ये आरोग्याशी संदर्भात एकही प्रस्ताव नव्हता. ऐनवेळी १० कोटींचा उपकरणे, औषध खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीत मांडण्यात आला. त्यामुळे स्थायी समितीत गदारोळ झाला. अनेक दिवसांचा कालावधी हातात असताना, सभा सुरू असताना प्रशासन सचिव कार्यालयात आरोग्य प्रस्तावाचे काम कसे करू शकते, असा सवाल या वेळी सदस्यांनी केला. स्थायी समितीची बैठक सुरू होताच सभापती नवीन गवते यांनी आरोग्य विभागाचे प्रस्ताव हे तातडीचे विषय असून ते पटलावर घेण्याची विनंती केली. यावर बहुतांश सदस्यांनी विरोध दर्शवला. ३१ मे रोजी होणारी स्थायी समिती सभा रद्द करून ती ६ जूनला घेण्यात आली. दरम्यान, सात दिवस हातात असताना हे प्रस्ताव का तयार करण्यात आले नाहीत, असा सवाल सदस्यांनी केला. सध्या आरोग्याचा विषय गंभीर असून औषधांचा तुटवडा भासत असल्याने या खरेदीस अखेर मंजुरी देण्यात आली.
महिनाभरात रुग्णालयात औषधांची पूर्तता
स्थायी समितीत १० कोटींच्या औषध खरेदी प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून उद्यापासून याचा कार्यारंभ आदेश काढण्यात येणार आहेत. तसेच महिनाभरात पालिका रुग्णालयात औषधांचा पुरवठा करण्यात येईल. यामध्ये ३०० प्रकारची औषधांचा समावेश आहे. गेल्या वर्षी फक्त तीन कोटींची औषध खरेदी करण्यात आली होती. यंदा मात्र १० कोटींची औषध खरेदी करण्यात येत असून पुढील वर्षभरात औषधांचा तुटवडा भासणार नाही.
प्रस्ताव मंजूर झाला असून उद्यापासूनच औषध खरेदीचे आदेश काढण्यात येणार आहेत. त्यानंतर महिनाभरातच पालिका रुग्णालयात सर्व प्रकारची औषधे पुरविली जातील. मोठय़ा प्रमाणात औषध खरेदी केल्याने पुढील वर्षभरात औषधांचा तुटवडा भासणार नाही.
-डॉ. रामास्वामी एन, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका