संशयित आरोपी वाहतूक पोलिसांच्या टोचण गाडीवरील कामगार
वाहतूक पोलिसांच्या टोचनगाडीवरील कामगारांच्या मारहाणीत सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नवीन पनवेल येथील पंचशीलनगर झोपडपट्टीच्या मागे असलेल्या परिसरात शनिवारी ही घटना घडली. तरुणींसोबत जाणाऱ्या दोन तरुणांना हटकल्यावरून सुरक्षारक्षकाला मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
रामभाऊ नाथाजी पाईकराव (वय ६७) असे मृताचे नाव आहे. पाईकराव यांनी हटकल्याचा राग मनात धरून तरुणांनी त्यांच्या घरात घुसून कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. यात पाईकरावांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
विष्णू वीरगम्या आणि सुनील चव्हाण हे दोघेही येथील एका पडीक इमारतीत शिरत होते. याच वेळी पुष्पधाम इमारतीच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या पाईकरावांनी दोघांना हटकले आणि त्यांना तेथून हुसकावून लावले. याचा राग मनात धरून विष्णू आणि सुनीलने धनराज कांबळे आणि नीलेश पात्रे यांना बोलावून घेतले. या सर्वानी मिळून पाईकराव यांच्या घरात घुसून त्यांच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केला. त्यानंतर पाईकराव यांचा १७ वर्षांचा मुलगा सीताराम आणि त्यांची पत्नी, लहान मुले यांनाही बेदम मारहाण केली.
या घटनेची बातमी परिसरात समजताच काही रहिवाशांनी मुलांचा शोध सुरू केला. नवीन पनवेल उड्डाणपुलाजवळील चर्चच्या शेजारी रोटरी सभागृह येथे वाहतूक पोलिसांची टोचण गाडी उभी करण्याची जागा आहे. ही मुले तेथेच त्यावेळी उभी होती. त्यामुळे पंचशीलनगरच्या संतप्त जमावाने तेथे धाव घेतली. दरम्यान टोचण गाडीवरील मुलांनी खांदेश्वर पोलिसांशी संपर्क साधून त्यांना बोलावले होते. पाईकराव यांनी प्रथम हल्ला केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशी तक्रार केली. या वेळी पोलिसांनी संतप्त जमावाच्या तावडीतून संशयितांना सोडवून घेतले.
पाईकराव यांचा १७ वर्षांचा मुलगा सीताराम यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर खांदेश्वर पोलिसांनी या खुनप्रकरणी चौघांना अटक केली. विष्णू विरगम्या, आसिफ शेख, धनराज कांबळे, सुनील चव्हाण, नीलेश पात्रे अशी अटक झालेल्या तरुणांची नावे आहेत.
टोचणगाडीवरील मुलांना पोलिसांचा आश्रय होता म्हणून त्यांची मजल घरात घुसून मारहाण करण्यापर्यंत गेली असाही आरोप पाईकराव यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.