जेएनपीटी बंदरातील वाढत्या वाहतुकीवर उपाययोजना म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व राज्य महामार्ग मंत्रालयाने जेएनपीटी ते पळस्पे फाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब व जेएनपीटी (करळ) ते आम्रमार्ग नवी मुंबई राज्य महामार्ग ५४ या दोन्ही रस्त्यांचे सहा व आठ पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. रुंदीकरणात दोन्ही रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या हलक्या व दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका (सव्‍‌र्हिस रोड) तयार करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने दिली आहे.
१६ ऑगस्ट २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जेएनपीटीमध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब तसेच राज्य महामार्ग क्रमांक ५४ या दोन्ही रस्त्याचे सहा व आठ पदरी रुंदीकरण करण्याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक व राज्यमार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय राज्य महामार्ग अधिनियम १९५६ नुसार भूसंपादनासाठीची अधिसूचना जारी केली आहे. या दोन्ही रस्त्याच्या रुंदीकरणामुळे सध्याच्या उरण-पनवेल रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. या रस्त्याच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे.
या रुंदीकरणाच्या वेळी जेएनपीटी (करळ) ते गव्हाण फाटा दरम्यानच्या रस्त्यावरील गावांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे जड कंटेनरची वाहतूक होणाऱ्या रस्त्यावरून हलक्या तसेच दुचाकी वाहनांची वाहतूक बंद होईल. त्याचा फायदा मार्गावरील जड वाहनांमुळे होणारे अपघात टळण्यास मदत होणार आहे. जेएनपीटी ते गव्हाण फाटा दरम्यानच्या ४३ किलोमीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण होणार असल्याचंी माहिती राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाचे उरण पनवेल विभागाचे प्रकल्पाधिकारी प्रशांत फेगडे यांनी दिली. येत्या एप्रिल २०१६ पासून प्रत्यक्ष रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात होऊन दोन वर्षांत रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. रस्त्याच्या रुंदीकरणामुळे दोन्ही रस्त्यांची रुंदी ३६ मीटर होणार आहे. तर दोन्ही बाजूने रस्त्यालगत येणाऱ्या गावांना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येणार असल्याने अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.