उरण शहरातील मुख्य नाल्यांची सफाई करण्यासाठी नगरपालिकेने १९ लाख रुपयांची निविदा काढली असून शहरातील प्रमुख २७ नाल्यांच्या सफाईची नव्वद टक्के काम पूर्ण केल्याचा दावा उरण नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात उरण शहरात पाणी साचण्याच्या घटना कमी होण्यास मदत होणार आहे. उरण शहरातील नाल्यातील गाळामुळे शहरातील सखल भागात पाणी साचत असल्याने नागरिकांच्या घरांतही पाणी जाते त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
उरण नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी उरण शहरातील प्रमुख नालेसफाई करण्यासाठी महिना भराचा अवधी देत कंत्राट दिलेले होते. या कंत्राटदाराने नाल्यातील काढलेला गाळ अनेक दिवस नाल्यांच्या काठावरच ढीग करून ठेवला होता. या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध होताच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कचरा आणि गाळाचे ढीग हटविण्यासाठी कंत्राटदाराला सांगितल्याने काढलेला गाळ पुन्हा नाल्यात जाण्यापासून वाचला आहे. या संदर्भात नागरिकांनीही वारंवार तक्रारी केल्या होत्या.
शहरात प्रामुख्याने द्रोणागिरी डोंगर परिसरातून येणारे ओढे व नाले यातून पाण्याचा प्रवाह अधिक असतो. त्यामुळे केगाव व नागाव या दोन ग्रामपंचायतींच्या हद्दीवर असलेले नगरपालिकेतून वाहणारे नाले दोघांच्या सहमतीने साफ केले जात आहेत. याचाही फायदा नागरिकांना होणार आहे.
नालेसफाईचे काम दिल्यानंतर या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नगरपालिकेने आरोग्य विभागाकडे जबाबदारी दिली असल्याची माहिती उरण नगरपालिकेचे अभियंता झुंबर माने यांनी दिली आहे. तर यावर्षी पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईची कामे हाती घेतल्याने आता पर्यंत ९० टक्के काम पूर्ण केल्याचाही दावा त्यांनी यावेळी बोलताना केला आहे.