नवी मुंबई महानगरपालिकेत नवी रणनीती; घोडेबाजाराला ऊत येणार
नवी मुंबई पालिका तिजोरीच्या चाव्या खिशात घातल्यानंतर आत्मविश्वास दुणावला आहे. पुढील वर्षी होणारी महापौर पदाची निवडणूकही खिशात घालण्याच्या इराद्याने शिवसेनेने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेत येण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी पक्षाचे दरवाजे सताड उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम म्हणून येत्या काळात पालिकेत घोडेबाजाराला ऊत येण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे मत राजकीय वर्तुळातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीचे वाशी आणि तुर्भे येथील पाच नगरसेवक फुटीच्या मार्गावर आहेत. शिवसेना व भाजपमध्ये येणाऱ्या नगरसेवकांच्या प्रभागात पोटनिवडणूक घेऊन युतीची ताकद वाढवण्याची व्यूहरचना रचली जात असून दिघा येथील राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक बेकायदेशीर बांधकामामुळे अडचणीत आले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या पाठिंब्यावर पालिकेची सत्ता उपभोगणाऱ्या राष्ट्रवादीला अल्पमतात आणण्याचे प्रयत्न शिवसेनेने आत्तापासून सुरू केले आहेत.
गतवर्षी एप्रिल महिन्यात पालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्यात राष्ट्रवादीचे ५३ नगरसेवक निवडून आले. तीन अपक्षांच्या पाठिंब्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ५६ नगरसेवकांच्या संख्याबळाची जुळवाजुळव राष्ट्रवादीने करून सत्तेचा सोपान राखण्याचा प्रयत्न केला. भविष्यात अल्पमताची जोखीम नको म्हणून मित्रपक्ष काँग्रेसच्या दहा नगरसेवकांचा आधार घेण्यात आला. त्यामुळे ही संख्या ६७ नगरसेवकांची झाली आहे. त्या बदल्यात काँग्रेसला उपमहापौर व काही समित्यांचे सभापती पद देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीला पाठिंबा देणारे अपक्ष नगरसेवक सुधाकर सोनावणे यांना पक्षाचे येथील सर्वेसर्वा माजी मंत्री गणेश नाईक यांनी महापौर पदाचा पाच वर्षांपूर्वीच ‘शब्द’ दिल्याने त्यांना महापौरपद देण्यात आले. महापौर पदासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्यत्व घेतले आहे, पण त्यांनी आपले अपक्षपद न सोडल्याने आजच्या घडीला पालिकेत अपक्ष नगरसेवकाकडे महापौर पद, शिवसेनेकडे स्थायी समिती, काँग्रेसकडे उपमहापौरपद अशी महत्त्वाची पदे विभागली गेल्याने पालिकेत सत्ता कोणाची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादीच्या हातातून स्थायी समिती सभापती पद खेचून आणल्याने शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील वर्षी होणारी महापौर निवडणूक खिशात घालण्याची महत्त्वाकांक्षा उराशी बाळगली आहे. या श्रीमंत नगरीचे गेल्या वर्षी महापौर पद मिळावे यासाठी शिंदे यांनी जंगजंग पछाडले होते. त्यासाठी विद्यमान महापौर सुधाकर सोनावणे यांना मोठय़ा पदाचे आमिष दाखविण्यात आले होते; मात्र सोनावणे या आमिषाला न भुलल्याने शिंदे यांनी अपक्षाच्या साह्य़ाने महापौर पद पटकाविण्याचा नाद नंतर सोडून दिला. आता स्थायी समिती ताब्यात आल्याने पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी पुढील वर्षीची महापौर निवडणूक जिंकण्याचा विडा त्यांनी उचलला असून खासदार राजन विचारे यावर काम करणार आहे. दोन दिवसांपूर्वी मिळालेले स्थायी समिती सभापती पद शिवसेनेला मिळवून देण्यात विचारे यांचा सिंहाचा वाटा आहे. पुढील वर्षी होणाऱ्या महापौर पदासाठी राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी केले जाणार आहे.
काँग्रेसला पक्षादेश वगैरेशी काहीही देणेघेणे नसून स्थानिक राजकारण नजरेसमोर ठेवून नाईक हाच एक विरोधी पक्ष अशी येथील नेत्यांची धारणा आहे. त्यामुळे स्थायी समिती निवडणुकीत मीरा पाटील यांनी राष्ट्रवादीला दाखवलेला हिसका हा स्थानिक नेत्यांच्या संमतीनेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात फार मोठा घोडेबाजार झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या राज्य अध्यक्षाचे आदेश येथील नेते नेहमीच गुंडाळून ठेवत असल्याने काँग्रेसच्या मदतीवर पुढील वर्षांचे महापौर पद काबीज करण्याच्या तयारीत शिवसेना-भाजप युती लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गटारावर झाकण नाही..
दिघा येथील बेकायदा बांधकामात राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक अडकले असल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द केले जाणार असल्याची चर्चा आहे. यात काही जातीची खोटी प्रमाणपत्रे सादर करणाऱ्या नगरसेवकांचाही समावेश आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे पाच-सहा नगरसेवकांना घरी बसविल्यानंतर त्या ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुका जिंकण्याचा शिवसेनेचा प्रयत्न राहणार आहे. वाशी येथील एक उच्चभ्रू लोकवसाहतीतील नगरसेवक राष्ट्रवादी नेत्यांच्या असहकाराला कंटाळला असून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. प्रभाग समित्या नसल्याने प्रभागातील एका गटाराचे झाकण बसविण्याचे काम होत नसल्याचा त्यांचा आरोप आहे.

गुप्त भेटींमध्ये वाढ
तुर्भे येथील एक नगरसेविका बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या संपर्कात आहे, तर याच भागातील झोपडपट्टीतील बाहुबली नगरसेवकाच्या एमआयडीसीतील व्यवसायांवर नाईक कुटुंबाकडून गदा येऊ लागल्याने त्याच्या शिवसेना नेत्यांबरोबरच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. या नगरसेवकाच्या ताब्यात तीन नगरसेवक आहेत. शिवसेना आणि भाजपच्या संपर्कात असलेल्या या नगरसेवकांचे राजीनामे घेऊन त्या ठिकाणी पोटनिवडणुका येत्या दीड वर्षांत घेतल्या जाणार आहेत. या खेळीमुळे राष्ट्रवादी अल्पमतात येण्याची खात्री वर्तवली जात असून काँग्रेस पुढील वर्षांच्या स्थायी समितीच्या बदल्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यास एका पायावर तयार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena eyes on nmmc mayor post
First published on: 12-05-2016 at 03:46 IST