सिडकोचे अध्यक्षपद पदरात पाडण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच वेळी महत्त्वाचे महामंडळ सेनेला न देण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे. अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, सुभाष भोईर आणि उपनेते विजय नाहटा यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर संचालक पदासाठी माजी संचालक नामदेव भगत आणि विजय चौगुले यांनी आपली ताकद पणाला लावली आहे.
सिडको हे राज्यातील एक श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना वसाहत, मेट्रो, उरण नेरुळ रेल्वे, जेएनपीटी विस्तार, स्मार्ट सिटी यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याच्या कामी लागली आहे. त्यामुळे हे महामंडळ स्वत:कडे खेचण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. आघाडी सरकारच्या काळात हे पद दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आले होते. सिडको, म्हाडा, एमएमआरडीए आणि प्रदूषण मंडळ या महामंडळांवरून सेना भाजपमध्ये वाद सुरू आहे. सिडको आणि एमएमआरडीएच्या नाडय़ा मुख्यमंत्र्यांकडे असल्याने ते भाजपकडे ठेवण्यात यावे असे मत भाजप नेत्यांचे आहे. शिवसेनेला हे अध्यक्षपद देण्यापेक्षा भाजपच्या मित्रपक्षांना देण्याचाही विचार केला जात आहे. त्यात निवडणुकीत पाठिंबा देणाऱ्या संघटनांचाही सहभाग आहे. त्यामुळे अध्यक्षपद न मिळाल्यास दोन संचालक पदासाठी माजी संचालक नामदेव भगत व विजय चौगुले यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या दोन्ही संचालकांना सिडकोत असलेली ‘क्षमता’ माहीत असल्याने त्यांनी पक्षातील लागेबांधे वापरण्यास सुरुवात केली आहे. अध्यक्षपदासाठी नाहटा यांनी थेट मातोश्रीला गळ घातली असून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची असून त्यांचा हिरवा कंदील प्रमाण मानला जाणार आहे. शिंदे यांनी प्रताप सरनाईक व भोईर यांच्या नावाला पसंती दिली आहे. सिडकोचे अध्यक्षपद यापूर्वी नवी मुंबईतील कोणत्याही कार्यकर्त्यांला देण्यात आलेले नाही. अध्यक्षपदावर बसलेल्या व्यक्तीने नि:पक्षपाती न्यायनिवाडा करावा याकरिता हे पद सिडको क्षेत्राबाहेरील व्यक्तीला देण्याचा पायंडा पाडण्यात आला आहे. तो यावेळी बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena lobbying for cidco chairman and director
First published on: 06-02-2016 at 01:05 IST