प्रशासनाला जाब विचारणार

नवी मुंबई- नवी मुंबई महापालिकेच्यावतीने नेरुळ सेक्टर १ येथील छत्रपती शिवजी महाराज चौकाचा कायापालट करण्यात आला आहे. याच चौकात आकर्षक देखाव्यांसह आकर्षक मेघडंबरीमध्ये जवळजवळ  ४६ लाख ८५ हजार रुपये खर्चातून तयार करण्यात आलेला शिवयांचा सिंहासनारुढ पुतळा सज्ज आहे. तारखेप्रमाणे १९ फेब्रुवारीचा तर आता तिथीप्रमाणे १७ मार्चचाही शिवजयंतीच्या दिवशी पुतळा बसवण्याची मागणी शिवप्रेमींकडून करण्यात आली होती.तसेच गुढीपाडव्याच्या किंवा १ मे महाराष्ट्र दिनाच्या किंवा शिवप्रताप दिनाच्या मुहूर्तावर तरी शिवरायांचा पुतळा बसवणार का असा प्रश्न शिवप्रेमींनी उपस्थित केला आहे.परंतू शनिवारी मध्यरात्रीनंतर शिवपुतळा शिवप्रेमींना माहिती न होता मेघडंबरीत आणून ठेवल्यामुळे शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

१९ फेब्रुवारीला तारखेप्रमाणे शिवपुतळा साकारण्यात यावा अशी मागणी शिवप्रेमींनी केली होती. शिवरायांचा पुतळाही आणून आर. आर पाटील उद्यानात ठेवला होता.तसेच नेरुळमधील  शिवाजी चौकातील सर्व कामे झाली असतानाही जाणीवपूर्वक पालिकेने पुतळा बसवण्याचे टाळले असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून करण्यात येत होता. त्याच कोणाला माहिती न होता पुतळा मेघडंबरीत आणल्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

पालिका प्रशासनाला पुतळा उभारण्यासाठी आवश्यक असलेली ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीही महापालिकेला आधीच प्राप्त झाली आहे. तसेच पुतळा निर्मितीचे कामही पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे १९ फेब्रुवारीच्या शिवजयंतीचा तसेच १७ मार्चचा मुहूर्तही हुकला असल्याने नेरुळ सेक्टर १ येथील चौकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेला शिवपुतळा कधी  साकारण्यात येणार  असा त्रागा शिवप्रेमींनी उपस्थित केला होता.  पालिका अभियंता विभागाकडून नेरुळ येथील चौकाच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. 

नेरूळ येथील चौकात शिवरायांच्या मावळ्यांचा आकर्षक देखावाही साकारण्यात आला आहे. त्यामुळे नेरुळ सेक्टर १ येथील शिवाजी चौकाचे रुपडे पालटले असून  मावळ्यांच्या देखाव्याचे सर्वांना आकर्षण आहे. शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळ्याचे काम पूर्णत्वास आले असून येथील सर्व कामांसाठी जवळजवळ १ .०६ कोटीपेक्षा अधिकचा खर्च पालिकेने केला आहे. शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळा निर्मितीसाठी जवळजवळ  ४६ लाखांपेक्षा अधिकचा खर्च आला आहे. यापूर्वी  वाशी येथील शिवाजी चौकाला परिसरात आकर्षक असे रुप देण्यात आले . त्यामुळे वाशी येथील  मध्यवर्ती असलेल्या शिवाजी चौकाची आगळी ओळख निर्माण झालेली असताना दुसरीकडे नेरुळ सेक्टर १ येथील शिवाजी चौकातही मेघडंबरीमध्ये शिवरायांचा    सिंहासनारुढ पुतळा कधी बसवला जाणार असा प्रश्न विचारण्यात येत होता.

नेरुळ  येथे असलेल्या गोलाकार चौकाची सर्वबाजुंनी रुंदी कमी केली गेली आहे. त्यामुळे वाहतूकही सुरळीतपणे  होत आहे. याच परिसरात विविध शैक्षणिक संस्था तसेच डॉ. डी वाय पाटील स्टेडियम असल्याने या परिसरात नेहमी वर्दळ असते.आतापर्यंत  चौकाला शिवाजी चौक असे नाव होते. पण चौकात असलेल्या देखण्या मेघडंबरीत मात्र पुस्तक प्रतिमा साकारली होती.परंतू आता शिवरायांचा  सिंहासनारुढ पुतळा साकारला जाणार आहे. या ठिकाणी पुतळा साकारण्याची मागणी माजी महापौर जयवंत सुतार  तसेच कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे देवनाथ म्हात्रे यांनी केली होती.शिवपुतळा बसवण्यात आल्यानंतर चौकाला अधिक देखणे व आकर्षक रुप मिळणार आहे.

आमच्या राजाला गुपचूप का आणले…?

नेरुळ सेक्टर १ येथील मेघडंबरीत  महाराष्ट्राचे व देशाचे श्रध्दास्थान असलेल्या शिवरायांचा आकर्षक व देखणा सिंहासानारुढ पुतळा उभारण्याची मागणी केली व ती पूर्ण होत असताना आमच्या राजाला वाजतगाजत  रस्त्यावर रांगोळी काढत दिमाखात आणले असते.पण पालिकेने गुपचूप मध्यरात्री शिवपुतळा आणून ठेवला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाचा निषेध आहे.शिवजयंती ,महाराष्ट्र दिन ,गुढीपाडवा, शिवप्रताप दिन यापैकी एका दिनाला जल्लोषात शिवपुतळा मेघडंबरीत आणावा अशी मागणी असताना गुपचूप पुतळा आणला. त्यामुळे प्रशासनाचा निषेध असून याबाबत जाब विचारणार आहे. देवनाथ म्हात्रे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट.

देशाच्या आराध्या दैवताला असे शांततेत ,मध्यरात्री का आणले ?

मेघडंबरीत शिव पुतळा बसवण्यास आधीच विलंब झाला आहे ते आत्ताच गुपचूप मध्यरात्री पुतळा आणणे चुकीचे आहे. सकाळी समजल्यानंतर मेकडांबरी जवळ जाऊन शिव पुतळ्याला नमस्कार करण्यासाठी गेलो असता तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी मला  हटकले. आमच्या राजाच्या पुतळ्याचे प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात व्हायलाच हवी. विनेश आगळे, शिवप्रेमी, नेरुळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनासाठी प्रतिक्षा !

नेरुळ येथील शिवाजी चौकात पालिकेच्यावतीने  मेघडंबरीत शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळा बसवण्याबाबत तयारी केली आहे. मेघडंबरीत शिवपुतळा आणला आहे. पण तेथे पुतळा ठेवल्यानंतर तेथे काही आवश्यक काम गरजेचे आहे.  मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी पालिका प्रयत्नशील  असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.