गळती, चोरीला चाप; कपातीचे संकट दूर होण्याची चिन्हे

नवी मुंबई महानगरपालिकेने गेले सहा महिने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे लक्षणीय पाणीबचत झाली आहे. त्यामुळे पाणी कपातीपासून दिलासा मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. पाणी गळतीचे प्रमाण १९ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत आणण्यात पालिकेला यश आले आहे. शिवाय आधुनिक मीटर लावण्यात आल्यामुळे आणि यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे नवी मुंबईकरांना पावसाळ्यापर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी याच काळात पालिकेने २० टक्के पाणी कपात केली होती.

राज्यात मुंबई पालिकेनंतर स्वत:चे धरण असलेली नवी मुंबई ही दुसरी पालिका आहे. त्यामुळे जेमतेम १२ ते १४ (प्लोटिंग लोकसंख्येसह) लाख लोकसंख्येच्या नवी मुंबईला पाणीटंचाईचे चटके बसण्याची शक्यता कमीच आहे, मात्र गेल्या वर्षी उन्हाळ्याच्या पाश्र्वभूमीवर डिसेंबर २०१५ पासूनच नवी मुंबई पालिकेने टप्प्याटप्प्याने पाणी कपात सुरू केली होती. पाण्याची उधळपट्टी करणाऱ्यांना या कपातीचा फटका बसला होता. त्यामुळे यंदाही पाणी कपात करावी लागेल, अशी शक्यता पालिकेने गेल्या वर्षी वर्तवली होती, मात्र पालिकेने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली काही महत्त्वाच्या उपाययोजना केल्या.

गेल्या सहा महिन्यांत विविध पातळीवर पाण्याचे ऑडिट केले जात आहे. त्यामुळे शहर, ग्रामीण व झोपडपट्टी भागातील रहिवाशांनी घेतलेल्या साडेतीन हजार बेकायदा पाणी जोडण्या तोडण्याचे काम पाणीपुरवठा विभागाने केले. काही इमारतींत वरच्या मजल्यांवर पाणी चढत नसल्याने अधिक शक्तिशाली मोटार बसविण्यात आल्या होत्या. अशा चार हजार मोटार जप्त करण्यात आल्या. एकटय़ा ऐरोली विभागातून अशा १९०० मोटारी जप्त करण्यात आल्या. वाणिज्यिक वापर सुरूअसताना रहिवासी वापर दाखवून पाणी बिलात सूट मिळवण्याची क्लृती लढवली जात होती. अशा व्यावसायिकांच्या जोडण्या तोडून त्यांना नवीन मीटरसह वाणिज्यिक वापराची जोडणी देण्यात आली. पाणीपुरवठा, त्यातील गळती आणि पाणीवापराचे अचूक मोजमाप करणाऱ्या एएमआर (ऑटोमॅटिक मीटर रीडिंग) पद्धतीचा वापर करण्यात आला. त्यासाठी सुमारे सहा हजार मीटर बदलण्यात आली. झोपडपट्टी भागात केवळ तीन पुरावे सादर केल्यानंतर हजारो जोडण्या देण्यात आल्या आहेत. यापूर्वी हे रहिवासी बेकायदेशीर पाणीवापर करत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे अधिकृत जोडण्यांबरोबरच पाणी विभागाचा तोटा या उपाययोजनेमुळे कमी झाला आहे. काही ग्रामीण व झोपडपट्टी भागांत नव्याने स्टॅण्ड पोस्ट देण्यात आले आहेत तर काही भागांतील स्टॅण्ड पोस्टवर पाणीपुरवठा होत नसताना देयके वसूल केली जात होती, त्या स्टॅण्ड पोस्टवर पाणी भरणाऱ्या सर्व ग्राहकांची देयके महापालिकेने माफ केली आहेत. त्यामुळे पालिकेची विश्वासार्हता वाढली आहे. पिण्याच्या पाण्याची चोरी करण्याऐवजी पाणी जोडणी घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे.

पाणीपुरवठय़ाविषयीच्या तक्रारींचे निवारण करणारी २४ तास उपलब्ध असणारी हेल्पलाइन पालिकेने सुरू  केली आहे. निसर्गानेही यंदा कृपा केली असून मोरबे धरण क्षेत्रात मुबलक पाऊस पडल्याने ८८ मीटर पाणी धरणात साठले आहे. एवढा पाणीसाठा नवी मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी पुरेसा आहे. यापूर्वी पालिका क्षेत्रातील १४ लाख लोकांसाठी ४०० दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा धरणातून केला जात होता. तो आता थेट ७० दशलक्ष लिटरने कमी करून ३३० दशलक्ष लिटपर्यंत आणण्यात आला आहे. त्यामुळे अशा अनेक उपाययोजना गेल्या सहा महिन्यांत सातत्याने राबवल्याने यंदा पाणी कपात करण्याचा प्रश्न उद्भवणार नाही, असे स्पष्ट संकेत पालिका प्रशासनाने दिले आहेत.

पालिका प्रशासनाने केलेल्या अनेक उपाययोजनांमुळे यंदा पावसाळ्यापर्यंत पाणी कपात करण्याची वेळ प्रशासनावर येणार नाही. यापूर्वी पालिका क्षेत्रातील एकूण पाणीपुरवठय़ापैकी १९ टक्के पाणीगळती होत होती. ही गळती पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे १२ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्याचा अंदाज आहे. त्याची पाहणी सध्या सुरू आहे. ही गळती आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

– अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका