बेकायदा फेरीवाल्यांमुळे गर्दी वाढली

नवी मुंबई</strong> : करोनावर कोणतीही ठोस उपचारपद्धती नसल्याने संसर्ग न होऊ देणे ऐवढेच आपल्या हातात आहे. यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ याचे भान ठेवत प्रत्येकाने गर्दीच्या ठिकाणे जाणे टाळणे, मुखपट्टीचा वापर करणे गरजेचे असतानाही नवी मुंबईत या नियमांना हारताळ फासल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी विनाकारण गर्दी केली जात असून बाजारात विक्रेत्यांसह नागरिक मुखपट्टीचा वापर करीत नाहीत. त्यात फेरीवाल्यांची भर पडली, ही ठिकाणे करोनाचे केंद्र होत आहेत.

नवी मुंबई शहरात करोनाबाधितांची संख्या ३० हजार पार झाली असून मृतांचा आकडाही वाढत आहे. गेल्या आठवडयात दररोज बाधितांची संख्या ही चारशेच्या घरात आहे.

नेरूळ विभागात शहरात सर्वाधिक करोनाबाधित आहेत. असे असताना बेकायदा फेरीवाल्यांनी नागरिकांची वाट अडविल्याचे चित्र आहे. नेरूळ रेल्वेस्थानकाच्या बाजूला फळ व भाजीविक्रेता बेकायदा व्यवसाय करीत आहेत. पदपथावरच ठाण मांडून बसलेल्या या विक्रेत्यांकडे भाजी व फळे खरेदीसाठी नागरिकही गर्दी करीत आहेत. या ठिकाणी बहुतेक भाजी विक्रेते हे मुखपट्टय़ांचा वापर करीत नाहीत. सामाजिक अंतराचा नियम तर पायदळी तुडवला जात आहे. त्यामुळे नेरूळ परिसरात करोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. बेलापूर सेक्टर ३ येथेही भाजी व फळ विक्रेत्यांकडे गर्दी होत आहे. हे विक्रेते रस्त्याच्या कडेला बसलेले असल्याने वाहतुकीसही अडथळा होत आहे. शिरवणे, जुईनगर सेक्टर २३, २५ मधील पदपथ, तुर्भे, कौपरखैरणे येथील गुलाबचंद डेरी परिसर तर वाशीमध्येही काही ठिकाणी हीच परिस्थिती आहे.

पालिकेकडून कारवाई

करोनाच्या संकटकाळात जर बेकायदा फेरीवाले, भाजीविक्रेते यांच्यामुळे नियमाचा भंग होत असेल तर संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनीही मासचा वापर करावा. शहराला करोना संसर्गातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येकाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ चे भान ठेवणे गरजेचे असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.