विनापरवाना विक्रेत्यांना पोलिसांच्या मदतीने हटविणार

नवी मुंबई : नवी मुंबई, मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग भागातील किरकोळ मासळी विक्रेत्यांच्या रोजगारावर गदा आणणाऱ्या मुलुंड ऐरोली जकात नाक्याच्या जागेत थाटण्यात आलेल्या परवानाधारक मासळी विक्रेत्यांना आणखी काही दिवस व्यवसाय करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र या बाजारात घुसखोरी करणाऱ्या विनापरवाना मासळी विक्रेत्यांना हुसकावण्यासाठी कोळी महासंघ पुढे सरसावला आहे. त्याला मुंबई पोलीस सहकार्य करणार आहेत.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मंडई (क्रॉफर्ड) मध्ये संक्रमण बाजार तयार झाल्यानंतर येथील परवानाधारक मासे विक्रेत्यांनादेखील त्या ठिकाणी हलविण्याचे आश्वासन मुंबई पालिकेच्या वतीने देण्यात आले आहे.

मुंबईतील क्रॉफर्ड बाजारातील मासळी विक्रेत्यांचे मुंबई पालिकेने बंद पडलेल्या मुलुंड ऐरोली जकात नाक्याच्या जागेवर पुनर्वसन केले आहे. हा बाजार पहाटे तीन वाजल्यापासून सुरू होतो. या घाऊक विक्रीमुळे अनेक किरकोळ मासे विक्रेत्यांना सोयीचे पडले असून आजूबाजूच्या उपनगरांतील रहिवासीदेखील या ठिकाणी घाऊक विक्री करू लागले आहेत. त्यामुळे नवी मुंबई, मुलुंड, भांडुप या मुंबई क्षेत्रातील मासळी विक्री करणाऱ्या कोळी महिलांच्या व्यवसायावर गदा आली आहे. त्यामुळे या महिलांच्या कोळी महासंघाने याविरोधात आवाज उठविला असून मासळी मंडई हटविण्याची मागणी केली होती. त्यासाठी रात्री आंदोलनदेखील करण्याची तयारी या महासंघाने केली होती. यासाठी दीड ते दोन हजार माहिला या आंदोलनात सहभागी होणार असल्याने पोलिसांनी हे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन कोळी महासंघाला करीत या आठवडय़ात ही मंडई हटविण्याचे आश्वासन दिले होते.

या बाजारात ९० टक्के मासे विक्रेते हे बेकायदा असून १० टक्के विक्रेते हे परवानाधारक आहेत. त्यामुळे परवानाधारक मासे विक्रेत्यांना व्यवसाय करू दिला जाणार असून मुंबई पालिकेचा परवाना नसलेल्या विनापरवानाधारक मासे विक्रेत्यांना हटविण्यात येणार असल्याचे कोळी महासंघाचे युवा अध्यक्ष अ‍ॅड. चेतन पाटील यांनी स्पष्ट केले आहे.