नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून डॉ. कैलास शिंदे यांनी महापालिकेतील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य सुविधेचा आढावा घेण्यासाठी त्यांनी बुधवारी पालिकेच्या वाशी रुग्णालयाला भेट देत ‘प्रिस्क्रीप्शन फ्री सेवा’ अर्थात औषधचिठ्ठी न देता रुग्णालयाकडून औषध पुरवठा करण्याच्या धोरणाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली या तीन रुग्णालयांपैकी वाशी रुग्णालयामध्ये सर्वाधिक संख्येने रुग्ण उपचारांसाठी येत असतात. त्या ठिकाणची दैनंदिन बाहयरुग्ण संख्याही अधिक आहे. त्यादृष्टीने तेथे नागरिकांसाठी पुरेशी बैठक व्यवस्था, पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध असावे तसेच दर्शनी भागात आरोग्यविषयक माहिती देणारे पोस्टर्स, डिजीटल फलक अशी आरोग्य सूचनांची प्रचारसाधने वाढवावीत असे निर्देश त्यांनी दिले.

हेही वाचा >>> उष्णतेमुळे आरोग्याची काळजी घेण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन

तळमजल्यासह तिन्ही मजल्यांवरील वैद्याकीय सेवांची पाहणी करताना तेथील हवा खेळती राहण्याच्या दृष्टीने तत्परतेने उपाययोजना कराव्यात. अंतर्गत स्थापत्य व रंगरंगोटीची कामेही जलद करून घ्यावीत, असे निर्देश आयुक्तांनी दिले. रुग्णालयात येणाऱ्या व्यक्तीला प्रसन्न वातावरण लाभावे यादृष्टीने कार्यवाही करण्याचे त्यांनी सूचित केले. त्याचप्रमाणे अंतर्गत स्वच्छतेवर अधिक लक्ष देण्याच्या सूचनाही दिल्या. रुग्णांना देण्यात येणाऱ्या भोजनाचा दर्जाही उत्तम राहील याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले.

रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना औषधचिठ्ठी न देता रुग्णालयामार्फतच औषध पुरवठा करण्यात येतो. या प्रिस्क्रीप्शन फ्री सेवेची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल व याबाबतची कोणतीही तक्रार प्राप्त होणार नाही याची विशेष दक्षता घेण्याचे आयुक्तांनी निर्देश दिलेत.

हेही वाचा >>> पनवेल : अधिकच्या परताव्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

रुग्णालयातील बाहयरुग्ण कक्ष, क्ष-किरण, सोनोग्राफी व सिटी स्कॅन कक्ष, पॅथोलॉजी, औषध वितरण कक्ष, अपघात विभाग, आपत्ती कक्ष, रक्तपेढी, आयसीयू, डायलिसीस, एनआयसीयू, प्रसूतीपूर्व कक्ष, शल्यचिकित्सा कक्ष, मेडिकल वॉर्ड, बालरोग विभाग, थॅलेसेमिया काळजी कक्ष, अस्थिव्यंग कक्ष, प्रसूती पश्चात कक्ष, औषध भांडार विभाग, मेडिकल रेकॉर्ड विभाग अशा विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी करीत आयुक्तांनी तेथील सुधारणांविषयी सूचना केल्या.

रुग्णांच्या डिजिटल नोंदी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाचा केसपेपर काढण्यापासून ते आंतररुग्ण (आयपीडी) सेवा घेऊन तो बरा होऊन घरी परत जाईपर्यंतच्या कार्यालयीन नोंदी डिजिटल स्वरूपात घेतल्या जाव्यात यादृष्टीने हॉस्पिटल मॅनेजमेंट इंटिग्रेटेड सिस्टीम प्रणाली अद्यायावत करण्याचे व कागदरहित कामकाज करण्याचेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. त्यांनी सर्व्हर रूमचीही पाहणी केली.

या भेटीदरम्यान त्यांच्यासमवेत वैद्याकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, शहर अभियंता संजय देसाई तसेच विविध डॉक्टर व अधिकारी उपस्थित होते.

वाशी हे शहरातील मध्यवर्ती रुग्णालय असून नवी मुंबईकरांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी संबंधित डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी यांनी अत्यंत जबाबदारीने काम करावे. – डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नमुंमपा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.