‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन
विज्ञान शाखेतून मेहनत घेऊन वैद्यकीय, अभियांत्रिकी शाखांसाठी ‘नीट’ अभ्यासाची गरज आहेच; पण विज्ञानातही इतर क्षेत्रे हुन्नरींसाठी खुणावताहेत. गणिताशी गट्टी जमलेल्यांना वाणिज्य शाखा हमखास यश मिळवून देईल. कला आणि ललित कलांमध्ये क्षमता पणाला लावल्यास यश मिळू शकते, याचा मूलमंत्र मार्ग यशाचा कार्यशाळेत मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विज्ञान शाखेतील करिअरसाठी अनेक पर्याय
केवळ मेडिकल, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर यांचाच विचार करून पुढील दिशा ठरविली जाते. सध्या महागडय़ा शिक्षण युगात कमी शुल्कात विज्ञान शाखेत करिअरच्या संधी आहेत. यासाठी सीईटी वा ‘नीट’ देण्याची गरज नाही. विज्ञान शाखेतून भूगोल विषयातही अनेक संधी उपलब्ध आहेत. बीएएमएस, बीएचएमएस, व्हेटरनरी सायन्स या विषयांची निवड केल्यास कमी फीमध्येही करिअर करता येते. सध्या व्हेटरनरीमधील विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी, बँका, विमा कंपन्या यांच्यात नोकरीची संधी आहे. तसेच यात विदेशातही जाऊन चांगल्या वेतनाची नोकरी करता येते, त्याचप्रमाणे फिजिओथेरपीचा अभ्यासक्रम आहे. परिचारिका (नर्स) अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर परदेशात उत्तम संधी आहे. फार्मसीचाही पर्याय उपलब्ध आहे. विज्ञान शाखेतूनच प्रिंटिंग, पेट्रोकेमिकल, पर्यावरण क्षेत्रात करिअरची संधी आहे.
– विवेक वेलणकर, समुपदेशक

क्षमता पणाला लावल्यास कला शाखेत यश नक्की
करिअर करताना स्वत:ची आधी कुवत ओळखावी लागेल. कोणत्या विषयात स्वत:ला रस आहे याचा विचार करूनच शाखेची निवड करावी. कला शाखा ही ‘डाऊन मार्केट’ समजलं जातं; पण हा समज चुकीचा आहे. कला शाखेत प्रवेश घेऊन क्षमता पणाला लावल्यास यश नक्की मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कला शाखेच्या विद्यार्थ्यांचे भाषेवर प्रभुत्त्व असणे गरजेचे आहे. तशी क्षमता असल्यास त्याचा फायदा होतो. करिअर करताना समाजाची गरज आणि स्वत:ची आवड हे करिअरच्या यशाचे गमक आहे. व्यक्तींव्यक्तींमध्ये फरक आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या यशाचा मार्गही वेगळा असतो. स्वत:ला जे आवडते त्यातच करिअर केले पाहिजे, असे दिवेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उदारीकरणामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून व्यवहार करण्यात येतात. त्यामुळे दुसऱ्या राष्ट्राची भाषा येत असेल तर दुभाषा म्हणून मोठय़ा प्रमाणात माणसांची गरज लागते. बहुभाषा कौशल्यामुळे त्यात करिअर करता येते. मानसशास्त्रातही करिअर करता येऊ शकते. सद्य:स्थितीत समुपदशेकांची गरज मोठय़ा प्रमाणात लागत आहे. सामजिक कार्यातही करिअर करता येते. त्याही करिअरच्या संधी आहेत.
– दीपाली दिवेकर, करिअर समुपदेशक

ललित कलांमध्ये करिअर
ललित कला क्षेत्रात विद्यार्थ्यांनी संयम पाळल्यास तसेच स्वत:ची क्षमता ओळखून कलेत सातत्य ठेवल्यास नक्कीच यश संपादन करता येईल. ललित कलेमध्ये चित्रकला, शिल्पकला, फॅशन डिझायनिंग, स्थापत्यकला, अॅनिमेशन, वस्त्राप्रावरणे, अभिकल्प, ध्वनिमुद्रण, जाहिरात क्षेत्रांत विद्यार्थ्यांना करिअर करता येऊ शकेल. उत्तम सर्जनशीलता, सूक्ष्म दृष्टी, एकाग्रता, प्रमाणबद्धता हे गुण त्या विद्यार्थ्यांच्या अंगी असणे गरजेचे आहेत. या क्षेत्रात स्पर्धा व आव्हाने असली तरीही या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी सातत्य राखल्यास स्वत:चे करिअर करता येऊ शकेल असे कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. स्वत:ची क्षमता ओळखूनच विद्यार्थ्यांनी हे क्षेत्र निवडले पाहिजेत. इतरांपेक्षा काही तरी वेगळे करण्याचा सकारात्मक विचार केल्यास स्वत:च्या कलेची छाप विद्यार्थी पाडू शकतील.
– जयवंत कुलकर्णी, समुपदेशक आयव्हीजीएस

‘नीट’साठी एनसीईआरटीच्या पुस्तकांचा अभ्यास करा
वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा द्यायची असेल तर अकरावी आणि बारावीमध्ये ‘एनसीईआरटी’च्या पुस्तकांचा अभ्यास करा. क्लासची संपूर्ण माहिती घेऊनच तेथे प्रवेश घेणे गरजेचे आहे. क्लासेसच्या प्रसिद्धीला बळी पडून प्रवेश घेऊ नये. ‘नीट’ परीक्षेमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. ‘नीट’च्या परीक्षेचा अभ्यासक्रम हा अकरावी आणि बारावीच्या ‘एनसीईआरटी’च्या अभ्यासक्रमांवर आधारित आहे. या पुस्तकांचा अभ्यास करून परीक्षा दिल्यास हमखास असे यश मिळेल. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घ्यायचा असेल तर ‘नीट’ या परीक्षेला पर्याय नाही. त्या परीक्षेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्या परीक्षेबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. २०१७ साली ‘नीट’च्या परीक्षेला बसणाऱ्यांना दोन वर्षांचा अभ्यासक्रम वर्षभरात पूर्ण करावा लागणार आहे. त्यामुळे १ मार्चपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करावा. त्यामुळे किमान चार तास अभ्यास करणे आवश्यक आहे. ‘नीट’ परीक्षेला सामोरे जायचे असेल तर किमान शंभर पेपरचा सराव करावा. महाविद्यालय आणि क्लासमध्ये सराव परीक्षा होतात. नीट परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग पद्धत आहे. आत्मविश्वासाशिवाय प्रश्न सोडवू नये.
– प्रा. नागेश सांवत, एस. के. सोमय्या महाविद्यालय

गणिताच्या दोस्तांना वाणिज्य शाखेत संधी
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उद्योग, शेअर बाजार, ट्रेडिंग, बँकिंग क्षेत्रासाठी वाणिज्य शाखा निवडावी. विद्यार्थ्यांच्या आवडीचा विचार पालकांनी करावा आणि नंतरच निर्णय घ्यावा. वाणिज्य शाखेतील पदविका संपादन केल्यानंतर चार्टर्ड अकाऊंटन्ट, कंपनी सेक्रेटरी, अर्थ विश्लेषक म्हणून संधी आहेत. गणितासोबत नेतृत्वगुण, सामाजिक शास्त्रांचा अभ्यास गरजेचा आहे.
– आमिर अन्सारी, समुपदेशक आयव्हीजीएस

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students get tips from expert on career in loksatta marg yashacha
First published on: 07-06-2016 at 04:40 IST