नवी मुंबई : बेलापूर सेक्टर १५ ए येथील भूखंड क्रमांक ४ येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागानेही पालिकेने येथील भूखंडाबाबत व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश नुकतेच नवी मुंबई महापालिकेला दिले आहेत.
बेलापूर सेक्टर १५ ए येथे हॉस्पिटलची निर्मिती करण्याची मागणी सातत्याने आमदार म्हात्रे यांनी लावून धरली होती. परंतु याच भूखंडावर स्थानिक क्रिकेट खेळत असल्याने हा भूखंड खेळाचे मैदान म्हणून आरक्षित करण्यासाठी स्थानिकांकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. यासाठी नवी मुंबईतील फोर्टी प्लस संघाने पालिका मुख्यालयावर मोर्चा आणत आंदोलनही केले होते. त्यामुळे या भूखंडावरून राजकीय खडाजंगी पाहायला मिळाली होती. या भूखंडाबाबतचा वाद न्यायालयापर्यंत पोहचला होता.
स्थानिक तरुणांनी या ठिकाणी खेळाचे मैदान व्हावे यासाठी प्रय़त्न केले होते. पालिकेवर आंदोलन करत पालिका मुख्यालयासमोरच क्रिकेट खेळत भूखंड खेळासाठी आरक्षित व्हावा यासाठी आंदोलन केले होते. परंतू दुसरीकडे आमदार मंदा म्हात्रे यांनी पालिका तसेच शासन दरबारी याबाबत सातत्याने पाठपुरावा करत या भूखंडावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा आग्रह धरला होता. विकास आराखड्यावर नगविकास विभाग तसेच उपमुख्यमंत्री यांचीही मंजुरीची मोहर उमटली असून हा भूखंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आरक्षित झाल्याने आता या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोट- या प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या सर्वसामान्य नागरिकांना अधिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. गोरगरीब सर्वसामान्य जनतेला व वैद्यकीय क्षेत्रात उंच झेप घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळणार आहे.- मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर
हा भूखंड सिडकोकडून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या वापरासाठी हस्तांतरित झाला आहे. त्यानुसार या भूखंडाच्या विकास योजनेत खेळाच्या मैदानाऐवजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असा वापर बदलण्यात आला आहे. त्याला शासनाकडूनही मंजुरी देण्यात आली आहे.- सोमनाथ केकाण, सहाय्यक संचालक, नगररचना विभाग, नवी मुंबई महापालिका