मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर पहिल्या मार्गिकेत चाक पंक्चर झाल्यानंतर कार त्याच जागी उभी केल्याबद्दल मुंबईतील कांदिवली येथील स्विफ्ट कारचा चालक अमरजित सिंग याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला.

दोन आठवडय़ांपूर्वी द्रूतगती मार्गावर पनवेलनजीक पहिल्या मार्गिकेतून धावणाऱ्या खासगी बसची स्विफ्ट कारला जोरदार धडक बसली होती. बस स्विफ्ट कारला आदळून रस्त्याकडेला उभी असलेल्या इनोव्हा गाडीला धडक दिली होती. या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला होता.

पहिल्या मार्गिकेत पंक्चर कार दुरुस्तीसाठी उभी केल्यानेच हा अपघात घडल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. यात अमरजित याच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. मंगळवारी अमरजितला अटक करण्यात आली. त्यानंतर काही तासांत त्याला जामीन मंजूर करण्यात आला. मोटार वाहन नियमांप्रमाणे चालकाचा निष्काळजीपणा हा जामीनपात्र गुन्हा आहे. त्यामुळे त्याला जामीन मंजूर झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या अपघातात ४३ जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक नव्या मोटारीसोबत कंपन्या सिग्नल उपलब्ध करून देतात. त्यामुळे अमरजितने चाक पंक्चर झाल्याने कार रस्त्यात उभी केल्यानंतर किमान ५० मीटर अंतरावर सिग्नल ठेवायला हवे होते. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला असता, असेही मत व्यक्त करण्यात येत आहे.

भीषण अपघाताचा अहवाल प्रादेशिक परिवहन विभागाने अद्याप पोलिसांना दिलेला नाही. सातारा येथील निखिल ट्रॅव्हल्सच्या खासगी बसच्या मालक वा व्यवस्थापकांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. सातारा आणि पनवेल येथील प्रादेशिक परिवहन विभागाचा अहवाल तपास करणाऱ्या पोलिसांनी अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी लेखी स्वरूपात मागितला होता, असे पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांनी सांगितले.