नवी मुंबई : करोनानंतर पालिका प्रशासनाने नेरुळ येथील पालिका रुग्णालयात अकरा दिवसांत उभारलेल्या प्रयोगशाळेत आता करोनाबरोबर स्वाइन फ्लूचीही चाचणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून त्याची सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यात सद्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांत मोठी वाढ झाली आहे. नवी मुंबईतही साथीच्या आजारांत वाढ झाली असून स्वाइन फ्लूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे तत्काळ निदान व तत्काळ उपचार ही करोना काळातील कार्यप्रणाली पालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केली असून यासाठी या प्रयोगशाळेत या चाचण्या करण्यात येत आहेत.

करोना काळात ही प्रयोगशाळा नवी मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाची ठरली. आतापर्यंत या प्रयोगशाळेत आतापर्यंत १३ लाख ७३ हजार २८८ इतक्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर या प्रयोगशाळेची क्षमता वाढून दिवसाला पाच हजारांपेक्षा जास्त चाचण्या करण्यात येत आहेत. करोनानंतर या प्रयोगशाळेत इतर दुर्धर आजारांच्या चाचण्या करण्यात येतील याची घोषणा या पूर्वीच पालिका प्रशासनाने केली होती. सद्या साथीचे आजार वाढले असून स्वाइन फ्लूचे रुग्ण मोठ्या संख्येने मिळत आहेत. करोनाकाळात तत्काळ निदान व तत्काळ उपचार ही उपचारपद्धती उपयोगी ठरली होती, ती याच प्रयोगशाळेमुळे. त्यामुळे आता करोनाच्या चाचण्यांचे प्रमाण कमी असल्याने या ठिकाणी स्वाइन फ्लूच्याही चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. मध्यम अथवा तीव्र स्वरूपाची स्वाइन फ्लूची लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर वाशी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या रुग्णांचे नमुने सार्वजनिक रुग्णालय, वाशी येथे संकलित करून नेरूळ येथील प्रयोगशाळेत तपासणी करण्यासाठी पाठविण्यात येत आहेत. स्वाइन फ्लू संशयित रुग्णांचे एच १ – एन १ सॅम्पल एनआयव्ही, पुणे येथे पाठवण्यात येत होते. तिथून अहवाल प्राप्त होण्यास विलंब होतो. त्यामुळे संसर्ग पसरत असल्याने आता या ठिकाणी चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लवकर अहवाल प्राप्त होणार असून संशयित रुग्णावर लवकर उपचार करणे शक्य होणार आहे.

आतापर्यंत ३३ रुग्ण नवी मुंबई शहरात स्वाइन फ्लूचा पहिला रुग्ण १९ जुलै रोजी आढळला होता. शहरात आत्तापर्यंत एकूण ७४,९६८ इतक्या संशयित रुग्णांची ओपीडीमध्ये तपासणी करण्यात आलेली असून ३३ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे. यापैकी सद्य:स्थितीत सहा रुग्ण उपचाराधीन आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swine flu lso tested in navi mumbai municipal corporation corona laboratory zws
First published on: 19-08-2022 at 21:11 IST