आर्थिक देवाण-घेवाण करताना ती पारदर्शी पद्धतीने व्हावी यासाठी तेरा वर्षांपूर्वी सिडकोत अमलात आणण्यात आलेली सॅप (सिस्टीम अॅप्लिकेशन प्रोग्राम) कार्यप्रणाली गेले सात दिवस बंद पडल्याने सिडकोत शुल्ककल्लोळ निर्माण झाला आहे. याचा सर्वाधिक फटका स्वप्नपूर्ती गृहसंकुलातील ग्राहकांना घरांचे शिल्लक पैसे भरताना बसला असून इतर देयक देवाण-घेवाण ठप्प झाली आहे. यावर उपाय म्हणून सिडकोने स्वप्नपूर्तीच्या ग्राहकांकडून मूळ रक्कम घेऊन ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत ही प्रणाली पूर्ववत होईल, असे सिडकोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
सव्र्हरमध्ये बिघाड झाल्याने सिडकोची सॅप कार्यप्रणाली ठप्प झाली आहे. राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडकोत जून २००३ रोजी ही प्रणाली लागू करण्यात आली. सिडकोतील सर्व आर्थिक व्यवहार याच प्रणालीद्वारे केले जात आहेत. ही प्रणाली बंद पडल्याचा सर्वाधिक फटका स्वप्नपूर्ती या सिडकोच्या खारघरमधील गृहसंकुलात घर आरक्षित केलेल्यांना बसला आहे. सिडकोने दोन वर्षांपूर्वी खारघर सेक्टर-३६ येथे अल्प व अत्यल्प अशा दोन आर्थिक उत्पन्न गटांतील ग्राहकांसाठी ३,३३४ घरांची एक भव्य गृहसंकुल योजना जाहीर केली आहे. त्यांची सोडत दीड वर्षांपूर्वी काढण्यात आली असून ग्राहकांना शुल्क भरण्याची पत्रं देण्यात आलेली आहेत. त्यानुसार सुमारे ५२७ ग्राहकांनी विविध वित्त संस्थांचे गृहकर्ज घेऊन आपल्या घरांचे पूर्ण पैसे भरलेले आहेत पण अडीच हजार ग्राहकांना अद्याप पूर्ण शुल्क भरणे शक्य झालेले नाही. त्यात नोटाबंदीमुळे बँकेत गेली दीड महिने चलनकल्लोळ सुरू आहे. त्यामुळे कर्जाचे प्रस्ताव सादर करूनही अनेक ग्राहकांना कर्जाचे डीडी प्राप्त झालेले नाहीत. सिडकोने स्वप्नपूर्तीसाठी पैसे भरण्याची शेवटची तारीख २८ डिसेंबर दिलेली आहे. त्यामुळे ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली असून अर्धे पैसे भरलेले असताना घर रद्द होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सिडकोने जाहीर केलेल्या तारखेपर्यंत घराची संपूर्ण रक्कम न भरल्यास घर रद्द करण्यात येईल, असे या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे. त्याच वेळी नेमकी सिडकोची सॅप कार्यप्रणाली मागील सोमवारपासून कोलमडली आहे. त्यामुळे काही ग्राहकांचे गृहकर्ज मंजूर असताना त्यांना पैसे मिळाल्याची संगणक पावती देण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. पावती मिळणार नसेल तर पैसे कसे द्यायचे, असा प्रश्न काही ग्राहकांनी उपस्थित केला आहे. त्या वेळी सिडकोने पूर्वीप्रमाणे पोचपावती लिहून देणे सुरू केले आहे पण यात विलंब आकाराची रक्कम निश्चित होत नसल्याने केवळ प्रिन्सिपल रक्कम घेतली जात आहे. सॅप संगणक कार्यप्रणालीत एका कोडमुळे त्या ग्राहकांनी किती उशिरा रक्कम भरली. त्यासाठी त्यांना किती दंड आकारला जावा याची माहिती एक क्लिकसरशी उपलब्ध होत असते. ती आकडेमोड करणे कर्मचाऱ्यांना शक्य नसल्याने प्रिन्सिपल रक्कम घेऊन सिडकोचा लेखा विभाग मोकळा होत आहे. त्यामुळे पूर्ण रकमेचे डीडी बनवून आणलेल्या ग्राहकांना पुन्हा प्रिन्सिपल रकमेचे डीडी तयार करण्यास धावपळ करावी लागत आहे. स्वप्नपूर्तीच्या ग्राहकांना चलन व सॅपकल्लोळ अशा दोन्ही गोंधळांचा सामना करावा लागत आहे. या सॅप अडचणीमुळे सिडकोतील इतर देयके मिळविण्यात कंत्राटदारांना अडचणी येऊ लागल्या आहेत.
गेली सात दिवस सॅप संगणकप्रणाली बंद आहे. त्यामुळे स्वप्नपूर्तीच्या ग्राहकांची अडचण झालेली आहे पण त्या ग्राहकांना विलंब आकाराचा भरुदड पडू नये यासाठी मूळ रक्कम घेतली जात असून त्याची पोचपावती दिली जात आहे. – डॉ. मोहन निनावे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, सिडको
सिडकोच्या स्वप्नपूर्ती संकुलाच्या सोडतीत घर लागले आहे, मात्र त्याचे पैसे भरताना नाकी नऊ आले असून आता ही सॅप संगणकप्रणाली ठप्प झाल्याने आणखी तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रिन्सिपल रक्कम भरल्याची सिडकोने मॅन्युअल पोचपावती दिली आहे. -सुरेश पाटील, घणसोली