पनवेलच्या खाडीमध्ये बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांविरोधातील सरकारी कारवाई अद्याप सुरूच आहे. पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांनी व त्यांच्या पथकाने शनिवारी रात्री जागरण करून गणेशपुरी येथे छापा टाकला. यामध्ये तब्बल १३० ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला. यावेळी ६ आरोपींसह वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे ४ ट्रक असा आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
महसूल विभागाचे पनवेलचे नायब तहसीलदार बी. टी. गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी गणेशपुरी येथील अवैध वाळू उपसाप्रकरणी मजनू शेख, इस्ताक अली शेख, कादीर शेख, लालू शेख, झीया उल शेख, बार्जमालक बिरुशेठ यांच्यावर कारवाई करण्यात आली. अशाच प्रकारचा अडीचशे ब्रासचा वाळू साठा गेल्या महिन्यात जुई कामोठे गावामध्ये पोलिसांनी जप्त केला होता. या प्रकरणातील गणेश वर्मासारखे संशयीत आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
वाळू उपसा करणारे भरती ओहोटीची वेळ पाहून बार्जच्या साह्य़ाने खाडीत शिरतात. खाडीच्या मध्यभागी गेल्यानंतर ते तीस ते चाळीस फूट खोलवर सुरुंग लावून पाण्याखाली स्फोट घडवून आणतात, या स्फोटामुळे भूगर्भात मोठा खड्डा पडतो आणि त्यातून निघालेली वाळू पंपाच्या साह्य़ाने बार्जवर आणली जाते. या स्फोटासाठी लागणारे जिलेटीन आणि स्फोटकाची पावडर कुठून आणली जाते याचा पोलिसांना शोध लागला नसल्याचे एका उच्च पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या धंद्यामध्ये काम करणारे अनेक मजूर पश्चिम बंगाल येथील असल्याचे तपासात उघड झाले आहे. खाडीकिनारपट्टीची सुरक्षा करण्यासाठी नवी मुंबईचा सागरी सुरक्षा विभाग तैनात आहे. मात्र या विभागाच्या दुलक्र्षित कारभारामुळे बेलापूर, खारघर, जुईकामोठे, गणेशपुरी, तरघर, कर्नाळा, उलवा, कर्नाळा, साई या गावानजीकच्या खाडीकिनारपट्टीत हा व्यवसाय फोफावला. स्थानिक सरकारी अधिकारी, राजकीय नेत्यांना महिन्याला ‘सलाम’ ठोकून हा व्यवसाय केला जातो. नवी मुंबई पोलिसांनी नुकताच सागरी सुरक्षा कवच सप्ताह साजरा केला. परंतु अनेक बडय़ा अधिकाऱ्यांनी अवैध वाळू उपशाविषयी बोलणे टाळले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Nov 2015 रोजी प्रकाशित
वाळू उपसा रोखण्यासाठी तहसीलदारांचे जागरण
पनवेलच्या खाडीमध्ये बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांविरोधातील सरकारी कारवाई अद्याप सुरूच आहे.
Written by मंदार गुरव
First published on: 25-11-2015 at 01:12 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tahsildar taking action against sand smaglar