नवी मुंबई:सानपाडा येथे राहणाऱ्या तेजस पाटील यांच्या मानेत मोनिष या त्यांच्याच लहान भावाने चाकू भोसकला. वेळेवर उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचले असून त्यांच्या भावाच्या विरोधात सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेजस यांचा पाणी वितरणाचा व्यवसाय असून या व्यवसायात  लहान भावाने मदत करावी अशी त्यांची इच्छा होती मात्र मोनिष याला वाईट संगत असल्याने तो कामात लक्ष देत नव्हता. यावरून दोन्ही भावांचे अनेकदा वादही झाले होते. शनिवारी सकाळी तेजस घरात असताना मनीष याने त्याच्या मानेत चाकू भोसकून पळ काढला यावेळी त्याचा एक मित्र हि त्याच्या समवेत होता.  तशाच अवस्थेत तेजस याला सानपाडा सेक्टर चार येथील एम पी सी टी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिस्थिती पाहता डॉक्टरांनी तात्काळ आवश्यक तपासण्या करून शस्त्रक्रिया केली व चाकू बाहेर काढला. हृदयाकडून मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या नस पासून काही मिलिमीटर चाकू असल्याने चार तासांच्या प्रयत्नांनी चाकू बाहेर काढण्याचे यश आले व तेजस वाचला.

हेही वाचा >>>नवी मुंबई: एपीएमसी संचालक मंडळाची न्यायालयीन सूनवणी महिन्याभराने

तेजस याची पत्नी गरोदर असल्याने उलवा येथे आपल्या माहेरी गेली होती. हि घटना घडताच तेजस याने चाकू मानेत असलेल्या अवस्थेत त्याचे सासरे भूपेंद्र पाल सिंग यांना फोन करून माझ्यावर चाकू हल्ला झाला असून पत्नी हरप्रीतला एम पी सी टी रुग्णालयात पाठवा असे सांगितले. भूपेंद्र यांनी तात्काळ मुलीस घेऊन रुग्णालय गाठले. तो पर्यंत तेजस याची शुद्ध गेल्याने चाकू कोणी मारला हे नक्की माहिती नसल्याने अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्या प्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारी तेजस शुद्धीवर आल्यावर त्याने दिलेल्या जवाब वरून मोनिष याच्या विरोधात हत्येचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा >>>उरण: श्रमिक मच्छिमारांनो आपल्या हक्कासाठी संघटीत व्हा ,सीटूच्या अध्यक्ष कॉ.के. हेमलता यांचे आवाहन

यात मोनीष आणि त्याचा मित्र महेश कांबळे हे आरोपी आहेत. या दोघांचा शोध सुरु असून मोनीष  याच्या विरोधात यापूर्वीही किरकोळ  गुन्ह्यांची नोंद आहे. मोनीष आणि जखमी तेजस यांच्यात मालमत्ता वरूनही वाद होते. डॉक्टरांनी वेळेवर आणि तातडीने उपचार केल्याने तेजस याचे प्राण वाचले आहेत. तो जेव्हा बोलण्याच्या स्थितीत आला त्यावेळी त्याने दिलेल्या माहिती वरून मोनीष आणि त्याचा मित्र महेश कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरु आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूराव देशमुख यांनी दिली. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tejas patil was stabbed in the neck by his younger brother monish in sanpada amy
First published on: 06-06-2023 at 18:21 IST