नवी मुंबई: केंद्र सरकारचा उपक्रम असलेले स्मार्ट सिटी व्हिलेज अंतर्गत नवी मुंबईतील दिवाळे गावात अनेक प्रकल्प आले असून आता त्यात मोठी भर पडली आहे. ती सोलर स्ट्रीट लाईट अर्थात सौर ऊर्जेने पूर्ण गाव उजळून निघणार आहे. यासाठी राज्य सरकारने १० कोटींचा निधी मंजूर केला असून याचे कामही लवकरच सुरु करण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सुटसुटीत, सर्व सुविधांयुक्त गावाचे स्वप्न प्रत्यक्षात साकरण्यासाठी स्मार्ट व्हिलेज हि संकल्पना केंद्र सरकारचा एक उपक्रम आहे. नवी मुंबईतील दिवाळे गाव स्मार्ट व्हिलेज अंतर्गत कामे सुरु आहेत. हे गाव खाडी किनारी असून मच्छीमारांचे गाव म्हणून ओळखले जाते. त्यासाठी याच उपक्रम अंतर्गत यापूर्वी जेट्टी उभा करण्यात आली शिवाय रस्ते , दैनंदिन बाजार आदी कामे झाली आहेत. त्यात आता सौर ऊर्जेच्या पथदिव्यांची भर पडली आहे. यासाठी राज्य सरकारने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या १० कोटीत दहा ठिकाणी हाय मास्क आणि खांबे बसवण्यात येणार आहेत. या हाय मास्क मुळे रात्रीही गाव उजळून निघणार आहे.
मंदा म्हात्रे (आमदार बेलापूर) सध्या वीज उत्पादनात येणारा खर्च पाहता अपारंपरिक उर्जेला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यातच या दिव्यांच्या मुळे विजेची मोठी बचत होणार आहे. दिवाळे गावातील सौर दिव्यांच्या (हाय मास्क) दहा कोटींची मंजुरी मिळाली असून तसे पत्रपत्रक काढण्यात आलेले आहे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर हि कामे पुढे सरकतील .