नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्थानक मधील भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम दत्त जयंती मुळे पुढे ढकलण्यात आले आहे. सानपाडा येथे जागृत दत्त मंदिर असल्याने भक्तांच्या सोयीसाठी हे काम पुढे ढकलण्यात आले आहे.

सानपाडा येथील रेल्वे स्टेशन मधील भुयारी मार्ग हा पावसाळ्यात डोकेदुखी बनला होता. सदर रस्ता हा सिमेंट वा डांबरी बनवण्यात आला नव्हता तर कडप्पा फरशीचा उपयोग करण्यात आला होता. वर्षानुवर्षे दुरुस्तीविना या मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली होती. ठिकठिकाणच्या फारशा निघाल्या होत्या. त्यात पावसाळ्यात खड्ड्यात पाणी भरल्याने कुठे खड्डा आहे हे कळत नव्हते. त्यामुळे वाहन चालकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत होता तर अनेकदा रिक्षाच्या पुढील चाकाचे रॉड तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. तर दुचाकी गाड्यांचे शॉक ऑप्सर नादुरुस्त होत असल्याचा अनुभव अनेकांना आला होता.

हेही वाचा >>>वाशी खाडी पुलासाठी निधी उभारणीला वेग; पैशांची निकड पाहून सिडकोकडून २०० कोटींची वेगाने वसुली?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिडकोने शीव पनवेल मार्ग सानपाडा ते सानपाडा रहिवाशी वसाहत यांना जोडण्यासाठी सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये भुयारी वाहतूक मार्गाचीही निर्मिती केली होती. स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी याबाबत वारंवार पाठपुरावा याची नोंद घेत अखेर सिडकोने १० लाख रुपयांहून अधिक खर्चाचे काँक्रीटीकरणचे काम हाती घेतले आहे. मागील आठवड्यातच हे काम चालू होणार होते. त्यासाठी भुयारी मार्गही एकच दिवस बंद करण्यात आला. मात्र श्री दत्त जयंती निमित्त भाविकांना सानपाडा अंडरपास मधून मंदिरात दर्शनासाठी येता जाताना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून हे काम दत्त जयंतीनंतर करण्यात यावे, अशी विनंती मौजे सानपाडा दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार २७ डिसेंबर पासून चालू होणार असून जानेवारी अखेर पूर्ण होणार आहे.