पनवेल : कामावरून दुचाकीवरून घरी परतणा-या तरूणाच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावून चोरटे फरार झाले आहेत. ही घटना खारघर येथील तवा हॉटेलसमोरील सिग्नलशेजारी बुधवारी रात्री अकरा वाजता घडली. महिलांप्रमाणे नवी मुंबईतील रस्त्यावरून फीरणारे पुरुषही असूरक्षित असल्याची भावना रहिवाशांमध्ये पसरली आहे. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
खारघर येथील सेक्टर २० येथील श्री टॉवरमध्ये राहणारे ३९ वर्षीय तरूण हे पहिली पाळीचे काम संपवून घरी परतत असताना ही घटना घडली. दुचाकीवरून घरी येणा-या या तरुणाने सिग्नलशेजारील गतिरोधक असल्याने दुचाकीचा वेग कमी केला. या दरम्यान अचानक दुचाकीशेजारी दुस-या दुचाकीवरून एक दुकली तेथे आली. धावत्या दुचाकीवरूनच मागे बसलेल्या चोरट्याने या तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून तेथून धूम ठोकली.
तरुणाने चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र अंधारात काही क्षणात चोरटे तेथून पसार झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविल्यानंतर चोरट्यांच्या दुचाकीचा सीसीटिव्ही कॅमेरामधून शोध घेतला. मात्र अद्याप तरी दुचाकीचा क्रमांक व इतर माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. बुधवारी रात्री अकरा ते सव्वाअकरा वाजण्याच्या सूमारास ही घटना घडली. त्यानंतर अशाच प्रकारची घटना नेरूळ येथे घडली.
दोन्ही प्रकरणातील चोरटे हे एकच असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. मात्र मागील अनेक दिवसात वृद्धांना पोलीस असल्याची बतावणी करून लुटणे असे रस्त्यावरील गुन्ह्याचे प्रकार नवी मुंबईत विशेष म्हणजे पनवेलमध्ये वाढले आहेत. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना प्रामाणिक व तंत्रस्नेही पोलीस बनविण्याच्या कारभारासाठी ओळखले जाते. मात्र रस्त्यावरील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी आयुक्त भारंबे यांनी विशेष लक्ष्य देण्याची गरज असल्याची मागणी रहिवाशांकडून होऊ लागली आहे.