नवी मुंबई : बेपत्ता झालेल्या व्यक्तीला शोधण्यासाठी सामान्य माणूस पोलिसांच्या कडे धाव घेत असतो. मात्र चार सप्टेंबर पासून बेपत्ता झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यालाच शोधण्यात अद्याप यश न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जातं आहे.
घरातील एखादी व्यक्तीं अचानक बेपत्ता झाली तर पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली जाते. ही तक्रार प्राप्त झाल्यावर पोलीस त्या व्यक्तीचा तपास सुरु करते. मात्र रबाळे पोलीस ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत असणारे सोमनाथ फापाळे हे ४ सप्टेंबर पासून बेपत्ता झाले आहेत. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार रबाळे पोलीस ठाण्यात दाखल केली होती मात्रतेरा दिवस उलटले तरीही त्यांना शोधण्यात पोलिसांना यश आले नाही.
बेपत्ता झालेले सोमनाथ काशीनाथ फापाळे (३१) हे कळंबोली रोड पाली येथे राहतात. चार सप्टेंबरला त्यांना रात्रपाळीची ड्युटी होती. तसें ते पोलीस ठाण्यात हजर ही झाले होते. त्या रात्री त्यांनी रात्रपाळी केली. मध्यरात्री त्यांचा आणि पत्नीचा संवाद मोबाईल वर झाला त्यावेळी त्यांनी गस्ती पथकात असून वाशी येथे असल्याचे सांगितले होते. तर सकाळी पावणे साडे सहा वाजता पत्नीने त्यांना फोन केला असता थोड्या वेळाने करतो असे सोमनाथ यांनी पत्नीला सांगितले.
शेवटचा फोन पावणे आठला झाला त्यावेळी त्यांचा आवाज वेगळा वाटल्याने पत्नीचे विचारणा केली असता मी टेन्शन मध्ये आहे फोन चार्जिंगला लावतो नंतर करतो म्हणून त्यांनी फोन ठेवला. त्या नंतर मात्र सोमनाथ यांच्याशी संपर्क झालाच नाही. याबाबत सोमनाथ यांच्या सहकारी राजेश हनवते यांना सोमनाथ यांच्या पत्नीने विचारले असता सोमनाथ सकाळी साडे सात वाजता काम संपवून कामावरून निघून गेले असे सांगण्यात आले. शेवटी एक दिवस वाट पाहून ५ तारखेला सोमनाथ यांच्या पत्नीने रबाळे पोलीस ठाण्यात सोमनाथ बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली .
या घटनेला तेरा दिवस उलटून गेले तरीही अद्याप त्यांचा शोध घेण्यात रबाळे पोलिसांना यश आले नाही. याबाबत रबाळे पोलीस जास्त माहिती देण्यात उदासीनता दाखवत आहेत. आम्ही तपास करीत आहोत एवढेच उत्तर दिले जाते. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांना विचारणा केली असता अद्याप आढळून आले नाहीत असे उत्तर त्यांनी दिले.