बाहेरील देशातून बंदरातून मागविण्यात आलेला माल गोदामापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कंटेनरचालकावर सोपविण्यात येत असून माल घेऊन जात असताना साथीदारांच्या मदतीने मालाची चोरी करण्याच्या घटनांत उरण परिसरात वाढ झाली आहे. अशाच प्रकारचा प्लास्टिकचा दाणा असलेला १८ लाखाचा माल घेऊन जाणाऱ्या वाहनाची चोरी केल्याची तक्रार उरण पोलिसांकडे केली होती. याचा तपास करीत असताना उरण पोलिसांनी १६ लाखांच्या मालासह तिघांना अटक केली आहे.
पीयूष भानुशाली यांनी १४ मार्चला उरण पोलिसांत खोपटा येथील ट्रान्स इंडिया गोदामातून भिवंडी येथील गोदामात नेण्यासाठी दिलेला माल चोरीला गेल्याची तक्रार नोंदविली होती. यामध्ये ४ लाख ५० हजाराचा ट्रेलर, दीड लाखाचा कंटेनर तर १२ लाख ६७ हजार ६४० रुपयांचा प्लास्टिकचा दाणा चोरीला गेला होता. याचा तपास उरण पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एम. आव्हाड करीत होते. त्यांनी केलेल्या तपासानंतर पंकजकुमार राधेशाम सिंग(२४) पूण, नवदीप विजय लवांडे (२५), चिंचवड पुणे व प्रमोद अण्णासाहेब चौगुले(२९) या तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १८, लाख ६७,६४० रुपयांचा मालापैकी १६ लाख रुपयांचा माल जप्त केला