नवी मुंबईतील दोन विविध घटनांत दोन जणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली. विहार तलावामध्ये आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला.
दिघा येथील खोपड तलावामध्ये मित्रांसोबत रंगपंचमी खेळून आंघोळीला गेलेले सुनील साळुंके (४१) हे पाण्यात बुडाले. त्यांच्यासोबत सुमारे ३० ते ३५ जण अजून या तलावात पोहत होते. साळुंके यांनी मद्य प्राशन केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तर दुसऱ्या घटनेत इलटन पाडा येथील ब्रिटिशकालीन तलावाच्या काठावर २५ वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह सापडला. या युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान मुंबईतील विहार तलावात गुरुवारी दुपारी एक ३२ वर्षे वयाचा तरुण बुडाला असून संजय बन्सीधर दास असे या तरुणाचे नाव आहे. सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. आता शुक्रवारी सकाळी शोध मोहिम पुन्हा हाती घेण्यात येणार आहे.