विकास महाडिक
गेल्या वर्षांतील घटनांकडे नजर टाकली तर पालिका प्रशासनाची नऊ महिने करोना संकटाशी सामना करण्यात गेली आहेत. कोविडसारख्या महामारी काळातही भ्रष्टाचार करण्याची परंपरा कायम ठेवली. तीन दिवसांनी नवीन वर्षांची सुरुवात होणार आहे. येणारे वर्षेही शहरासाठी अनेक आव्हाने घेऊन येत आहेत. यात पालिका निवडणुकांसह स्वच्छ अभियानात प्रथम क्रमांक मिळवणे हे हे मोठे आव्हाने नवी मुंबईसमोर असणार आहे.
यंदा एप्रिल महिन्यात होणाऱ्या नवी मुंबई पालिकेची सार्वत्रिक निवडणूक करोना साथ रोगामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. करोना रुग्णसंख्या वाढत असताना देशात व राज्यात निवडणुका झालेल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, वसई-विरार पालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होण्याची दाट शक्यता आहे. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये या निवडणुका घेण्याच्या हालचाली सरकार पातळीवर सुरू आहेत. चौदा हजार ग्रामपंचायत निवडणुका होणार असल्याने आता पालिका निवडणुका घेण्यास कोणताही अडसर नाही.
हे वर्षे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थाचे करोना विषाणूबरोबर लढण्यात गेले आहे. त्यामुळे अनेक नागरी कामांना बगल देण्यात आली असून सप्टेंबरपासून या कामांना काही प्रमाणात चालना मिळाली आहे, मात्र राज्य शासनाने खर्चाला काही मर्यादा घातलेल्या आहेत. मार्चपासून सुरू झालेल्या टाळेबंदीनंतर पहिले काही महिने चाचपडणाऱ्या पालिकेने नंतर आरोग्य यंत्रणा उभारण्यात चांगले यश मिळाले. त्यासाठी माजी पालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांच्या ढिसाळ कारभाराची लक्तरे वेशीवर टांगण्यात आली होती. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांना नारळ दिला. त्यांच्या जागी नागपूरहून आलेल्या अभिजित बांगर यांनी रुग्णसंख्या वाढणारच, पण मृत्युदर रोखण्याचा पालिका प्रयत्न करेल, असे ठाम मत व्यक्त करून पाच हजार रुग्णशय्येपेक्षा जास्त क्षमता असलेल्या १३ करोना काळजी केंद्रांची उभारणी केली तर पाचशे अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारांसाठी वाशीत रुग्णालय तयार ठेवण्यात आले. त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्यानंतरही नागरिकांनी पालिका यंत्रणेवर विश्वास दाखविला. वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात उभारलेल्या काोविड काळजी केंद्रात दाखल होण्यासाठी करोनाबाधित रुग्णांना रांगा लावलेल्या दिसून आल्या होत्या. कोविडसारख्या महामारी काळातही भ्रष्टाचार करण्याची परंपरा पालिकेने कायम ठेवली ही या वर्षांतील अतिशय काळी घटना असून नवी मुबंईसारख्या सुशिक्षित शहराला शोभणारी नाही. कोविडसाठी उभारण्यात आलेल्या वैद्यकीय कंत्राटामध्येही अनेकांनी हात धुऊन घेतले आहेत. यापेक्षा उद्यानांची कामे न करता आठ कोटी रुपयांची देयके देण्याची अफलातून काम पालिका प्रशासनाने केले आहे. कोविडसारख्या काळातही अशा प्रकारे भ्रष्टाचार करणारे अधिकारी सर्वसामान्य स्थिती असताना काय करीत असतील याची कल्पना न केलेली बरी. उद्यान घोटाळ्यावर नंतर पांघरूण घालण्याचे काम केले जात आहे. या घोटाळ्यात आयुक्तांनी तीन अधिकाऱ्यांना निलंबित करून चौकशी सुरू केली आहे. ती पारदर्शक झाली पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे. नवी मुंबईकर या चौकशीकडे बारकाईने बघत आहेत. आयुक्त बांगर यांचा या चौकशीत कस लागणार आहे.
याच वर्षांत वाशी येथील बस आगाराच्या मेकओव्हरचे काम सुरू झाले आहे. यासाठी लागणारी पर्यावरण परवानगी पालिकेला मिळालेली आहे. या ठिकाणी सतरा मजल्यांची इमारत उभी राहणार आहे. यातील कार्यालये भाडय़ाने दिली जाणार असून एनएमएमटीला त्यातून उत्पन्न मिळणार असून एनएमएमटीची बुडती नौका पार लागणार आहे. कोविडकाळातही अशा काही सकारात्मक घटना पालिकेसाठी घडलेल्या आहेत. यात पालिकेला स्वच्छ भारत अभियानात मिळालेला तिसरा क्रमांक हा लक्षवेधी आहे. त्यामुळे पालिका आता पहिल्या क्रमांकासाठी प्रयत्न करीत असून ‘निश्चय केला नंबर पहिला’ असा संकल्प प्रशासनाने केला आहे. त्यासाठी शहरातील सर्व भिंती, मोकळ्या जागा रंगविण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी लोकजागृतीचे संदेश देण्यात आले आहेत. शहरातील तलाव, उड्डाणपुलांच्या खाली विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पहिल्या क्रमांकासाठी पालिका काहीही करण्यास तयार आहे. इंदूरसारखे जुने शहर हा बहुमान केवळ लोकसहभागावर पटकावीत आहे. नवी मुबंई पालिकेने यंदा लोकसहभाग जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. देशातील पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून नावारुपास येण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवी मुंबईत पुढील वर्षी राज्यातील लक्षवेधी निवडणूका होणार आहेत. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूका झाल्यानंतर देश व राज्यात भाजपाचा बोलबाला असताना राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते गणेश नाईक यांनी या शहरातील पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात कायम ठेवण्याचा करिष्मा दाखविला होता. त्यावेळी नाईक यांचे राज्यात कौतुक झाले होते, पण पुढील वर्षी ही पालिका त्यांच्या ताब्यात राहणार की जाणार हे ठरविणारे वर्षे आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाईक राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केल्याने मावळते पालिका सभागृह हे भाजपाच्या ताब्यात होते. सध्या या पालिकेवर प्रशासक नेमण्यात आल्याने कोणत्याही पक्षाची सत्ता गेली दहा महिने नाही. त्या निपक्ष पालिकेत पुढच्या वर्षी कोणाची सत्ता येणार हे ठरणार आहे. त्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी नाईक यांना कात्रजचा घाट दाखविण्यासाठी आघाडी करण्याचा अगोदरच निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरुध्द नाईक अशी लढत पुढील वर्षी राज्याला पाहण्यास मिळणार आहे. या काळात नाईक यांची घरवापसी होण्याची चर्चाही सुरू झाली आहे. त्यामुळे केवळ नाईक यांच्या भोवती फिरणारे नवी मुंबईचे राजकारण पुढील वर्षी स्पष्ट होणार असून, महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्र लढविल्यास सत्तेचा सोपना गाठणे या पक्षांना सोपे जाणार आहे. त्यामुळे गेली पंचवीस वर्षे नाईक यांच्या हाती असलेली एकहाती सत्ता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. सत्तेसाठी नाईक यांनी कुस बदलली तर सर्वाच्या अपेक्षांवर पाणी फेरले जाणार आहे. या निवडणुकीत ‘मनसे’चे अस्तित्व स्पष्ट होणार आहे. त्यामुळे येणारे नवीन वर्ष स्वच्छ शहराचा मान प्राप्त करणाऱ्या नगरीतील निवडणुकाही लक्षवेधी ठरणार आहेत.