लोकसत्ता टीम
उरण: उरणच्या पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटकांनी मांदियाळी भरली आहे. उन्हामुळे होणारी अंगाची काहिली शमविण्यासाठी पर्यटक समुद्रात डुंबण्याचा तसेच लाटांचा आनंद घेत आहेत. उरण मधील पिरवाडी हा तसा छोटासा किनारा आहे. मात्र तरीही या किनारपट्टीवर सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे.
सध्या मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे पिरवाडी किनाऱ्यावरील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. या परिसरात मुंबईच्या धर्तीवर उच्च दर्जाच्या राहण्या-खाण्याच्या सुविधा म्हणून हॉटेल्स उभे राहिले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील इतर समुद्र किनाऱ्याप्रमाणे समुद्री पर्यटनासाठी पर्यटकांची पावले आता वळू लागली आहेत. याचा परिणाम आपोआपच पर्यटन आणि इथल्या व्यवसाय वाढीवर होऊ लागला आहे.
मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील पर्यटक
उरण पिरवाडी किनाऱ्यावर एक दर्गा असून या दर्ग्यावर येणारे भाविक हे मुंबई, ठाणे व नवी मुंबई सह इतर ठिकाणाहून येतात. यातील बहुतेक पर्यटक हे रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी येतात. त्यामुळे सध्या पिरवाडी किनाऱ्यावरील पर्यटकांची संख्या वाढली आहे.