पनवेल : पनवेलमध्ये बुधवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांनी प्राण गमावले आहेत. या दोनही घटनांची नोंद कळंबोली आणि पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कळंबोली येथील अपघातामध्ये २९ वर्षीय तरुणाने प्राण गमावले आहेत.पनवेल तालुक्यामध्ये राज्य व राष्ट्रीय महामार्ग आणि सेवा रस्त्यांचे जाळे पसरले आहे. यंदाच्या वर्षी जानेवारी ते जून या दरम्यान आतापर्यंत ४० हून अधिक जणांचा पनवेलमध्ये अपघातामध्ये प्राण गेले आहेत.

पनवेल मुंब्रा महामार्गावरील कळंबोली पोलीस ठाण्याशेजारील सेवा रस्त्यावर बुधवारी दुपारी तीन वाजता कळंबोली गावातील शर्मा बेकरीशेजारी राहणारा अनिकेत जाधव हा कामावर बीमा कॉम्प्लेक्स येथे स्कुटीवरून जात असताना मागून आलेल्या ट्रेलरने अनिकेतच्या स्कूटीला धडक दिली. रस्त्यावर कोसळलेल्या अनिकेतच्या अंगावरून ट्रेलरचे चाक गेल्याने अनिकेत जागीच ठार झाला. याबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात २३ वर्षीय ट्रेलरचालक शिवप्रकाश वर्मा याच्यावर हलगर्जीपणाने ट्रेलर चालविल्यामुळे गुन्हा नोंद करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक तृत्पी शेळके या अधिक तपास करीत आहेत.

दूस-या घटनेत सकाळी साडेनऊ वाजता कसळखंड गावच्या समोरील रसायनी रस्त्यावरून दुचाकीने ४७ वर्षीय वसंत लबडे हे कामानिमित्त दुचाकीवरून जात असताना त्यांना आयशर टेम्पोने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.   पनवेलमध्ये अनेक महामार्ग व अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविण्यासाठी तसेच खड्यात दुचाकींचे चाक रुतल्याने होणारे अपघातांसोबत बेशीस्त वाहन चालविण्यामुळे अनेकदा अपघात घडत आहेत. याच खड्यांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने गणेशोत्सवापूर्वी विविध राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर खड्डे बुजवून घेणे गरजेचे आहे.