रविवारपासून रिमझिम; पेरणीच्या कामांना जोम
उरण तालुक्यातील शेतकरी मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेले असताना रविवारपासून उरणमध्ये मान्सूनचे आगमन झाले असून येथील शेतकरी सुखावला आहे. तर सततच्या उष्ण तपामानामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनाही या पावसाने दिलासा दिला आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मागील दोन दिवसांपासून रिमझिम व अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी येत आहेत. त्यामुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
उरणमधील भातशेतीत शेतकरी सुक्या भाताच्या बियाणांची पेरणी करतात. साधारणत: पंधरा जूनच्या आत मान्सूनचे आगमन होत असल्याचा अंदाज असल्याने ही पेरणी केली जाते.असे असले तरी यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ घातले होते.तर हवामान खात्याच्या अंदाजांचा फज्जा उडत असल्याने काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता, असे मत नितेश पंडित या मोठीजुई येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला. शेतीची मशागत व पेरणी करून पावसाची वाट पाहात असलेल्या शेतकऱ्यांना या रिमझिम पावसाने दिलासा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी शेतीच्या मशागतीला लागला आहे. रविवारी रात्री काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. परिणामी अनेक ठिकाणी पाऊस साचून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. उरण तालुक्यातील धरण क्षेत्रातही मागील दोन दिवसांच्या पावसामुळे ११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती उरणच्या एमआयडीसीचे सहअभियंता रणजित काळेबाग यांनी दिली.त्यामुळे धरणातील पातळीत वाढ झालेली नाही. तर पहिल्याच पावसामुळे उरण शहर तसेच उरणच्या पूर्व विभागातील चिरनेर तसेच इतर अनेक ठिकाणची वीज गायब झाली होती. या संदर्भात उरणच्या महावितरण कंपनीचे साहाय्यक अभियंता पी.एस.साळी यांच्याशी संपर्क साधला असता पूर्व विभागातील दिघोडे परिसरातून वीज खंडित झालेली होती. तर उरण शहरात सकाळी सहाच्या दरम्यान वीज नव्हती. मात्र सध्या पाऊस सुरू असूनही वीज सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मात्र वीज खंडित होण्याच्या घटनेमुळे पुन्हा एकदा महावितरणच्या मान्सूनपूर्व कामाचा बोजवारा उडाला आहे.यावरून पुढील तीन महिन्यांत वीज गायब होण्याच्या समस्येला उरणमधील जनतेला सातत्याने सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.