उरणच्या हनुमान कोळीवाडय़ासंदर्भात लोकायुक्तांचे आदेश
उरणच्या जेएनपीटी बंदरासाठी विस्थापित झालेल्या हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन येत्या चार महिन्यांत करण्याचे आदेश बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर लोकआयुक्तांनी दिले. १९९७ मध्ये या गावाला वाळवी लागली होती. त्यामुळे संपूर्ण गावाचे पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.
जागतिक पातळीच्या बंदरासाठी उरण मधील शेवा व कोळीवाडा ही दोन गावे विस्थापित झाली होती. महसूल विभागाने या दोन्ही गावांचे वेगळवेगळ्या ठिकाणी पुनर्वसन केले होते. यातील शेवा गावाचे बोकडविरा येथे तर कोळी समाजाचे गाव असल्याने कोळीवाडय़ाचे उरण मोरा मार्गावरील बोरी पाखाडी खाडीकिनारी पुनर्वसन करण्यात आले. या दोन्ही गावांचे नाव आता बदलले आहे. शेवा गाव नवीन शेवा तर कोळीवाडा गाव हनुमान कोळीवाडा या नावाने ओळखले जाते. या दोन्ही गावांना पुनर्वसन कायद्यानुसार जे भूखंड मिळायला हवे होते, त्यापेक्षा कमी क्षेत्रफळात त्यांचे पुनर्वसन करण्यात आल्याचा आक्षेप येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. तर हनुमान कोळीवाडा गावाचे फेरपुनर्वसन करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार विभागापर्यंत धाव घेतली होती. त्याचबरोबर फेब्रुवारी २०१७ मध्ये राज्याच्या लोकायुक्तांकडेही त्यांनी दाद मागितली होती. यावर राज्याचे लोकायुक्त एम. एल. तहलियानी यांनी महिनाभरात सर्व बाबींची शहानिशा करून येत्या चार महिन्यांत हनुमान कोळीवाडय़ाचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले आहेत.