उरण : दुचाकी वाहनांसाठी उरण रेल्वे स्थानकात पे अँड पार्क सुरू आहे. या वाहनतळावर वाहने उभी करण्यासाठी १२ तासांकरिता २० रुपये आकारण्यात येत आहेत. हे दर अधिक असल्याने उरण रेल्वे स्थानकातून प्रवास करणारे प्रवासी आपली दुचाकी वाहने जुन्या रेल्वे स्थानक व उरण पनवेल मार्गाच्या दोन्ही बाजूला उभी करतात. येथील वाहनांसाठी कोणतीही सुरक्षा नसल्याने वाहन चोरीचा धोका वाढला आहे.
उरण ते नेरुळ आणि बेलापूर मार्गावरील स्थानकात आकारण्यात येणारे वाहन शुल्क कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ही मागणी करण्यात आली होती. यात दर कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याची अंमलजावणीही व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. या संदर्भात मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे. या लोकल सेवेला दीड वर्ष पूर्ण होत आहे. उरणमधील रेल्वे प्रवाशांवर प्रवासापेक्षा वाहन शुल्काचा भार सहन करावा लागत आहे. हे दर कमी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
महिन्याला तिकिटाचे २२५ तर वाहन शुल्क ४५० रुपये
उरण ते खारकोपर मार्गावरील लोकलच्या स्थानकात उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांसाठी रेल्वेकडून महिन्याच्या तिकीट दरापेक्षा अधिक दर वसूल केला जात आहे. त्यामुळे येथील लोकलच्या प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यात उरण ते घणसोली यासाठी २२५ रुपयांचा मासिक पास आहे. तर वाहनासाठी महिन्याला ४५० रुपये मोजावे लागत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत.
रस्ता अपघाताचा धोका
उरण कोटनाका ते बोकडवीरा पोलीस चौकी हा मार्ग प्रचंड रहदारीचा मार्ग आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूनी मोठ्या संख्येने दुचाकी वाहने उभी केली जात आहेत. या मार्गालगतच्या वाढत्या वाहनसंख्येमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.