उरण : गेल्या दोन दिवसांपासून संततधार आणि अधून मधून होणाऱ्या मुसळधारीमुळे उरण शहर आणि तालुक्यातील अनेक मार्ग पाण्याखाली गेले आहेत. सततच्या पावसामुळे उरण मधील जनजीवन ही विस्कळीत झाले आहे. येथील उरण पनवेल मार्गावरील बोकडवीरा गावाजवळील वायू विद्युत केंद्र कामगार वसाहत,वीर वाजेकर महाविद्यालया समोर, जसखार मार्ग,जेएनपीए कामगार वसाहत ते फुंडे मार्ग शहरातील टीप टॉप इलेक्ट्रॉनिक, वैष्णवी हॉटेल, पंचायत समिती ते सातरहाटी मार्ग ,पालवी हॉस्पिटल आदी भागात मार्गावर पाणी साचले होते. तर दुसरीकडे उरणच्या पूर्व विभागातील काही मुख्य मार्गही पाण्याखाली गेले होते. याच मार्गातील खड्ड्यांमुळे ही नागरिकांना व प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
या पावसामुळे उरण शहरासह तालुक्यातील अनेक परिसरात पाणी साचल्याने नागरीकांची एकच तारांबळ उडाली. ही स्थिती उद्भवण्यास येथील प्रशासन जबाबदार असून त्यांच्या दुर्लक्षामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. या पावसामुळे उरण शहरातील मुख्य मार्गावर पाणी भरले होते. तसेच उरण शहरातील बोरी-शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, उरण-मोरा येथील रस्त्यावर पाणी साचले होते. वैष्णवी हॉटेल ते कुंभारवाडा, आपला बाजार, साठे हॉटेल, गणपती चौक, पालवी हॉस्पिटल, खिडकोली नाका आदी परिसरातील रस्त्यांवरही प्रमाणावर पाणी साचले होते.
उरण शहराला जोडून असलेल्या नागाव काठेआळीमध्ये रस्ता आणि नाला एकच झाला होता. उरण येथील ओएनजीसी प्रकल्प आणि द्रोणागिरी डोंगरातून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात नागावमध्ये येत असल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. तर जासई, रांजणपाडा, चिर्ले, नवघर, पागोटे, कुंडेगाव,बोकडवीरा आदी गावातील रस्त्यांवरही पावसाचे पाणी साचले होते. शहरातील काही रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. शहरातील सातरहाटी येथील खेळाचे मैदानही तुडुंब भरले होते.