उरण : बदलत्या वातावरणामुळे उरण शहर आणि तालुक्यातील अनेक गावात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यातील अनेक रुग्ण हे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. उरण मध्ये डेंग्यू आणि व्हायरल तापाची साथ असल्याची माहिती उरणच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे ऊन पावसाचा सामना नागरिकांना करावा लागत होता. त्यातच अनेक ठिकाणी साचणारे पाणी आणि मोठ्या प्रमाणात असलेले कचऱ्याचे ढीग व त्यांची दुर्गंधी यातून निर्माण होणारे डास याचा परिणाम तापाच्या साथीत झाले आहे.
अस्वच्छता वाढू लागल्याने व वातावरणाच्या बदलाने तापाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्याची भांडी कोरडी करण्याच्या,स्वच्छता राखण्याच्या, तसेच सार्वजनिक गटारांची साफसफाई व फॉगिंग करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीना देण्यात आल्या असून या संदर्भात एक बैठक ही घेण्यात आली असल्याची माहीती उरणचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र ईटकरे यांनी दिली आहे.
शासकीय यंत्रणा उदासीन
उरण मध्ये एकूण दोन शासकीय रुग्णालय आहेत. या रुग्णालयात उपचार न घेता बहुतांशी रुग्ण हे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या रुग्णांची माहीती काही रुग्णालये शासनाला देतात मात्र बहुतांशी रुग्णालये ही माहीती देत नसल्याचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणने आहे. शासकीय रुग्णालयात ऍडमिट होण्याची व्यवस्था नसल्याने अनेक रुग्ण आर्थिक स्थिती नसतांना ही नाइलाजास्तव खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे मत उमेश पाटील या रुग्णाने व्यक्त केले आहे.