नवी मुंबई : वाशी सेक्टर-२८ परिसरात नागरी कामादरम्यान सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे वीज केबलवर ड्रिलिंग झाले. या प्रकारामुळे सौम्य स्फोट होऊन परिसरातील वीजपुरवठा काहीकाळ खंडित झाला होता.

पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी सुरु असलेल्या ड्रेनेज कामात काही कामगार ड्रिल मशीनच्या सहाय्याने काम करत होते. यावेळी त्यांनी जमिनीखाली असलेल्या वीज केबलवर अनवधानाने ड्रिल केले, त्यामुळे सौम्य स्फोट झाला. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जिवीतहानी झाली नाही, मात्र या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.

कामगारांकडे कोणतीही सुरक्षा उपकरणे नव्हती आणि वर्क परमिट देखील सादर करण्यात आले नाही, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्यांनी याची माहिती तात्काळ महापालिका आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कामगारांना केबलखाली वीजवाहिनी असल्याची माहिती नव्हती. तसेच, काम सुरु करताना संबंधित विभागाचे सुरक्षा निरीक्षक जागेवर हजर नसल्याचीही माहिती समोर आली आहे.

महापालिकेच्या नियमानुसार अशा प्रकारच्या नागरी कामांपूर्वी ठरावीक कार्यपद्धती (एसओपी) पाळणे अनिवार्य असते. मात्र, या प्रकरणात त्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात नागरिकांनी नवी मुंबई मनपाचे मुख्य शहर अभियंता शिरीष आरदवाड यांना कळवले असता या घटनेची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकारामुळे नागरी प्रकल्पांमध्ये सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. अनेक ठिकाणी सुरू असलेल्या नागरी कामांमध्ये सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे निरीक्षण सामाजिक कार्यकर्ते बी.एन.कुमार यांनी नोंदवले असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.