नवी मुंबई : विंदा करंदीकर, व. पु. काळे, पु. ल. देशपांडे अशा साहित्य क्षेत्रातील नावाजलेल्या लेखक, कवींनी भेट दिलेल्या वाशीतील मराठी साहित्य मंदिर सभागृहातील आसन व्यवस्थेची दुरवस्था झाली आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी मंडळाच्या वतीने निधी संकलन मोहीम सुरू करण्यात आली असून साहित्यप्रेमींनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.वाशी येथील मराठी साहित्य, संस्कृती आणि कला मंडळाची स्थापना ८ फेब्रुवारी १९७९ रोजी करण्यात आली. या मंडळाने १९८२ साली सिडकोकडून जागा घेतली. या जागेवर १९८५ साली बांधकाम करण्यात आले. १९९५ साली याचे बंदिस्त सभागृहात रूपांतर करण्यात आले. या सभागृहात १९९६ साली विष्णुदास भावे सभागृहातील खुर्च्या बसविण्यात आल्या होत्या. त्यानंतर या सभागृहाचे २००९ साली अद्ययावत सभागृह तयार करण्यात आले. मात्र, मराठी साहित्य, संस्कृती आणि कला मंडळाच्या सभागृहात बसविण्यात आलेल्या खुर्च्यांची अवस्था या गेल्या २९ वर्षांच्या सलग वापरामुळे जर्जर झाली आहे. त्यामुळे सर्व जुन्या खुर्च्यांच्या बदलासाठी आणि आवश्यक दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता भासत असल्याचे समोर आले आहे. संस्थेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून, ही जबाबदारी एकत्रितपणे पार पाडण्याचे आवाहन मंडळाने साहित्यप्रेमींना केले आहे.
सभागृहात होणारे कार्यक्रम
मराठी साहित्य, संस्कृती आणि कला मंडळ सभागृहात वसंत व्याख्यानमालेला सुरुवात झाली. या सभागृहात वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पुस्तक प्रकाशन, विविध नाटकांचे प्रयोग होत असतात. त्याचप्रमाणे विविध शैक्षणिक उपक्रमांचेदेखील आयोजन केले जाते. दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो. दर वर्षाला विनाशुल्क ३५ ते ४० कार्यक्रम पार पडतात.
खर्च किती?
प्रत्येक नव्या खुर्चीचा अंदाजे खर्च पाच हजार रुपये इतका आहे. परंतु जुन्या खुर्च्यांची दुरुस्ती आणि नव्या रंगरूपासाठी प्रतिखुर्ची १५०० रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या सभागृहात एकूण ५१५ खुर्च्या आहेत. प्रत्येक साहित्यप्रेमीने किमान एक खुर्ची दुरुस्त करण्यासाठी १५०० रुपये योगदान द्यावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८२०५७०२९४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
प्रतिक्रिया
करोनानंतर मंडळाला आर्थिक गरज भासू लागली. विष्णुदास भावे सभागृहाच्या खुर्च्या सभागृहात बसविण्यात आल्या होत्या. सभागृहात बसविलेल्या खुर्च्यांना ३० वर्षे उलटून गेली आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येक साहित्यप्रेमींनी एक खुर्चीसाठी आर्थिक मदत केल्यास आसन व्यवस्था दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण होईल. सुभाष कुलकर्णी, अध्यक्ष, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ