वाशी, कल्याण, पनवेल बाजारात भाजीपाल्याच्या एक हजार गाडय़ांची आवक, तरीही भाव चढेच
भाजीपाला नियंत्रणमुक्त झाल्यामुळे शेतकरी आता थेट ग्राहकांच्या दारात आपला भाजीपाला घेऊन येतील असा गाजावाजा करण्यात येत असताना भाजीउत्पादक शेतकऱ्यांना मात्र कृषी उत्पन्न बाजार समित्याच प्रिय असल्याचे चित्र गुरुवारी पाहावयास मिळाले. शेतकऱ्यांना बाजार समित्यांतील व्यापारी आणि अडते लुटत असल्याचा आरोप असून, त्यामुळे सरकारने फळे आणि भाजीपाला नियंत्रणमुक्त केला. त्यावर बाजार समितीअंतर्गतही भाजीपाला नियंत्रणमुक्त करावा अशी मागणी करीत व्यापाऱ्यांनी संप पुकारला. मात्र हा संप मागे घेतल्याचे वृत्त येताच गुरुवारी सकाळी वाशी येथील बाजार समित्यांच्या दारात भाजीपाल्याच्या तब्बल ६१८ गाडय़ा येऊन उभ्या राहिल्या, तर कल्याण, तसेच पनवेल येथील बाजार समित्यांच्या आवारातही भाजीपाल्याच्या सुमारे साडेतीनशे गाडय़ांची आवक झाली.
दरम्यान, एवढय़ा मोठय़ा प्रमाणात आवक झाल्यामुळे भाज्यांचे घाऊक बाजारातील दर २० ते २५ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून येत होते. घाऊक बाजारात फुटकळ भावात विकली जाणारी भाजी किरकोळ बाजारात मात्र चढय़ा भावानेच विकली जात होती. व्यापाऱ्यांचा संप, तशात राज्यात झालेला मुसळधार पाऊस यामुळे मुंबईत भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली होती. संप काळात काही शेतकऱ्यांनी मुंबईत थेट भाजीपाला पाठविला. व्यापाऱ्यांच्या विनंतीवरून चार दिवस भाजी न पाठविणाऱ्या शेतकऱ्यांनी बुधवारी संप मिटल्यानंतर मात्र कोबी, फ्लॉवर, टोमॅटो यांसारख्या भाज्या मोठय़ा प्रमाणात बाजार समितीकडे पाठविल्या. आवक वाढल्याने भाजीपाल्याचे भाव कमी झाले. त्याचा फायदा मात्र सर्वसामान्य ग्राहकांना होताना दिसला नाही. किरकोळ विक्रेते संप व पावसाचे कारण देऊन चढय़ा भावानेच भाज्या विकत होते.
व्यापारी-खरेदीदारांत जुंपली
शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून अडत पट्टी कापून घेण्यात यावी या सरकारच्या ठाम भूमिकेमुळे गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता एपीएमसीच्या तुर्भे येथील घाऊक बाजारात व्यापारी व खरेदीदारामध्ये चांगलीच जुंपली. भाजी बाजार पहाटे तीन वाजल्यापासून सुरू होत असल्याने या वेळेत सुमारे चार ते पाच हजार व्यापारी, माथाडी, वाहतूकदार व इतर घटकांची रेलचेल सुरू असते. प्रत्येक ठिकाणी खरेदीदाराकडून दलाली कापून घेतली जात असल्याने संतापलेल्या खरेदीदारांनी गोंधळाला सुरुवात केली. तब्बल एक तास बाजारात हा गदारोळ सुरू होता. अखेर मोठय़ा प्रमाणात बाजारात आलेली नाशिवंत भाजी प्रथम खरेदी करा, पट्टीबाबत शनिवारी चर्चा केली जाईल, असे आश्वासन काही व्यापाऱ्यांनी दिल्यानंतर हा बाजार पूर्ववत सुरू झाल्याची माहिती समितीचे माजी संचालक शंकर पिंगळे यांनी दिली.
ग्राहकांपेक्षा व्यापाऱ्यांनाच पसंती
शेतकऱ्यांना बाजाराची दारे खुली करून दिली असली तरी ते आपला माल घेऊन थेट ग्राहकांपर्यंत जाण्याऐवजही व्यापारांकडेच जाणे पसंत करत असल्याचे चित्र दादर, बोरिवली परिसरातील भाजी बाजारातही गुरुवारी दिसत होते. गेले दोन दिवस एपीएमसीमधील व्यापाऱ्यांनी केलेल्या संपाच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी आपला माल थेट ग्राहकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यवहारकौशल्याअभावी त्यांना यात अपयश आले. यामुळे त्यांच्याकडे दोन दिवस जमा झालेला भाजीपाला अखेर गुरुवारी किरकोळ बाजारातील व्यापाऱ्यांना विकणेच पसंत केले. तर दुसरीकडे एपीएमसीमधील व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांकडून आठ टक्के अडत मागत असल्याने किरकोळ विक्रेत्यांनाही थेट शेतकऱ्यांकडून माल घेणे सोयीचे ठरत होते. परिणामी गुरुवारी बाजारात भाजी नेहमीपेक्षा कमी उपलब्ध असल्यामुळे बाजारातील व्यवहारांची गती काहीशी मंदावली होती.