नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या निवासस्थानी १३० मतदारांची नोंदणी झाल्याच्या वृत्तावर जिल्हा प्रशासनाने दिलेले स्पष्टीकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) फेटाळले आहे. मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण हे हास्यास्पद असल्याची टीका केली आहे. सोमवारी (३ नोव्हेंबर) मनसेच्या पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणावर जोरदार आक्षेप नोंदवला.
मनसेने नवी मुंबईतील बेलापूर मतदार संघातील मतदार नोंदणीत मोठे घोळ असल्याचा आरोप केला आहे. सार्वजनिक शौचालयांपासून ते थेट महापालिका आयुक्त निवासस्थानापर्यंत मतदारांची नोंदणी आढळून आली आहे. महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी १३० मतदारांची नोंद असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतल्यानंतर, जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) स्पष्टीकरण दिले होते. संबंधित यादीतील “मनपा आयुक्त निवास” हा केवळ ओळखचिन्ह (लँडमार्क) म्हणून नमूद असून, कोणताही मतदाराचा पत्ता प्रत्यक्षात “आयुक्तांचे निवासस्थान” असा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
लँडमार्क सांगून जबाबदारी झटकू नका – मनसे
जिल्हाधिकाऱ्यांच्या या स्पष्टीकरणावर गजानन काळे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. “मतदार यादीतील घोळ स्पष्टपणे दिसत आहेत. आयुक्त निवासाचा उल्लेख ‘ओळखचिन्ह’ म्हणून केला असला तरी, त्या विभागात वास्तव्यास नसलेल्या लोकांची नावे यादीत आढळली आहेत,” असे काळे म्हणाले.
काळे यांनी पत्त्यातील त्रुटींवर बोट ठेवत म्हटले आहे की, पत्ता लिहिताना मतदाराच्या घराचा क्रमांक, सोसायटी किंवा इमारतीचे नाव या महत्त्वाच्या गोष्टी लिहिलेल्या नाहीत. तसेच, लँडमार्क असेल तर ‘जवळ’ किंवा ‘बाजूला’ असे लिहिलेलेही आढळलेले नाही. “हा गंभीर प्रशासकीय निष्काळजीपणा असून, केवळ ‘लँडमार्क’ सांगून जबाबदारी झटकता येणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
त्याशिवाय, या १३० मतदारांपैकी ४० जणांनी विधानसभा निवडणुकीत मतदान केल्याचा पुरावा मनसेने शोधून काढला असून, येत्या काही दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना तो सादर करण्यात येणार असल्याचेही गजानन काळे यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकारी आणि पोलिंग एजेंटने मनसेने सोबत यावे आणि या मतदारांचे घर क्रमांक आणि पत्त्यासहित नावे शोधून दाखवावीत. त्यानंतरच ‘आयुक्त निवास’ हा लँडमार्क आहे हे आम्ही मान्य करू असे आवाहन गजानन काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केले आहे.
याचबरोबर, जुईनगरमधील सुलभ शौचालयावर मतदार नोंदणी प्रकरणाबाबतही जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण अपुरे असल्याचे मनसेने म्हटले आहे. दीड वर्षांपूर्वी जर ती व्यक्ती तिथे राहत होती तर आता दीड वर्षांनंतरही त्या व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळण्यात का आले नाही? असा सवाल काळे यांनी उपस्थित केला आहे.
माजी आयुक्तांचे नावही दोन ठिकाणी!
यावेळी मनसेने आणखी एक धक्कादायक खुलासा करताना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या यादीनुसार, नवी मुंबईचे माजी महापालिका आयुक्त आणि आताचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. राजेश नार्वेकर यांचे नाव मतदार यादीत अजूनही नमूद असल्याचे आढळून आल्याची माहिती काळे यांनी दिली. त्याचबरोबर डॉ. राजेश नार्वेकर यांचे नाव ठाण्याच्या मतदार यादी क्रमांक १४८ मध्येही असल्याचे काळे यांनी सांगितले. त्यामुळे नार्वेकर यांचं नाव दोन्ही ठिकाणी कसे? हे नाव जर नवी मुंबईच्या मतदार यादीतून वगळण्यात आले असेल तर त्याला अनुक्रमांक आहे का? हा शोधण्याचा आणि गमतीचा विषय असल्याचे गजानन काळे यांनी म्हटले.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) दिलेल्या स्पष्टीकरणावेळी सादर करण्यात आलेल्या मतदार यादीत डॉ. राजेश नार्वेकर यांचे नाव नवी मुंबईच्या मतदार यादीत नमूद होते. परंतु, सोमवारी (३ नोव्हेंबर) निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मतदार यादी पुन्हा तपासली असता डॉ. नार्वेकर यांचे नाव नवी मुंबईतील मतदार यादीतून रद्द केल्याचे आढळले आहे.
मनसेने निवडणूक आयोगाकडे या सर्व प्रकरणाचा स्वतंत्र सखोल तपास करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच “निवडणूक याद्यांमधील घोळ लपवण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारू,” असा इशाराही मनसेने दिला आहे.
