पालिकेच्या पुढाकाराने ‘लेट्स सेलिब्रेट फिटनेस’ संस्थेचा उपक्रम

नवी मुंबई</strong> : अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आजही शहरातीलअनेकांपर्यंत पोहचत नाहीत. लोकसहभागातून त्यांना मदतीसाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेतला असून लेट्स सेलिब्रेट फिटनेस संस्थेच्या मदतीने शहरभर माणुसकीच्या भिंती उभारण्यात येणार आहेत. सध्या वाशीत हा उपक्रम सुरू असून याला नवी मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

नवी मुंबई सुनियोजित, स्वच्छ व राहण्यायोग्य शहर असले तरी शहरात आजही अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा मिळत नाहीत. शहरातील प्रत्येक सिग्नल व उड्डाणपुलाखाली नजर टाकली तरी दररोज मागून खात पोट भरणाऱ्यांची मोठी संख्या आहे. या गरिबांच्या या मूलभूत गरजा पालिका प्रशासनाने लोकसहभागातून पूर्ण करण्याचा एक उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी लेट्स सेलिब्रेट फिटनेस संस्थेची मदत घेतली आहे.

शहरातील वर्दळीच्या ठिकाणी एखादी भिंती रंगवून त्या ठिकाणी खिळे, दोरी बांधून नागरिकांना जुने कपडे, चादर,चप्पल, बूट, पुस्तके आदी वस्तू या ठिकाणी ठेवण्याचे आवाहन केले आहे. या ठिकाणी जमा झालेल्या वस्तू गोरगरीब, गरजवंतांना लेट्स सिलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. बेलापूर ते ऐरोलीपर्यंत ठिकठिकाणी या माणुसकीच्या भिंती उभारण्याचे नियोजन आहे.

प्रायोगिक स्वरूपात वाशी सेक्टर २, ९ आणि १६ या ठिकाणी ही संकल्पना राबविण्यात येत आहे. आतापर्यंत नागरिकांनी या संस्थेकडे दीड हजार कपडे, ५०० ते ६००जुनी पुस्तके व इतर वस्तू जमा केल्या आहेत. या वस्तू संस्थेच्या माध्यमातून आदिवासी कुटुंब, आश्रम, झोपडपट्टीतील गोरगरिबांना वापट करण्यात येत आहेत, असे लेट्स सिलिब्रेट फिटनेस संस्थेच्या संस्थापक रिचा समेट यांनी सांगितले.